उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा फडणवीसांना टोला
देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला नाही ही त्यांची खंत आहे असं म्हणत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी त्यांना टोला लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस १७ सप्टेंबरला झाला. त्यानंतर शुक्रवारी भाजपाने व्हर्च्युअल रॅलीचं आयोजन केलं होतं. ज्यामध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी युती केली ही चूक झाली. युती नसती तर भाजपाच्या १५० प्लस जागा आल्या असत्या असं वक्तव्य केलं. याबाबत उदय सामंत यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी फडणवीस यांना पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला नाही ही खंत असल्याचा टोला लगावला. औरंगाबादमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आणखी काय म्हणाले उदय सामंत?
औरंगाबाद येथे झालेल्या पत्रकार परिषदेत उदय सामंत यांनी नाणार प्रकल्पाबाबतही शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. नाणार प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही ही भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. शिवसेना त्या भूमिकेवर कायम आहे असंही त्यांनी सांगितली. उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुखही आहेत. त्यांनी नाणारबाबत याआधीच भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे शिवसेना आजही त्या भूमिकेवर कायम आहे. कोणत्याही परिस्थिती नाणारचा प्रकल्प होणार नाही ही शिवसेनेची भूमिका आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.
शुक्रवारी भाजपाच्या रॅलीत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?
“भाऊ तोरसेकर यांनी २०१३ मध्ये सांगितलं होतं की भाजपाने नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून निवडलं तर संपूर्ण बहुमत २७२+ जागा भाजपाला मिळतील. त्यावेळी भाऊ तोरसेकर अशक्य वाटणारा अंदाज बांधत आहेत असं अनेकांना वाटलं. मात्र त्यांचं ते भाकित खरं ठरलं. २०१९ मध्येही काहिशी अस्थिरता होती. त्यावेळीही भाऊ म्हणाले होते की ३००+ जागा येतील. लोकसभा निवडणुकीत तेच घडलं. त्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळीही त्यांनी एक पुस्तक लिहून भाजपाला पर्याय दिले होते. भाजपा १५०+ किंवा युती २००+ त्यावेळी आपण युतीचा पर्याय निवडला. स्वतंत्र लढण्याचा पर्याय निवडला नसता तर तोरसेकर यांचं तिसरं भाकित खरं ठरलं असतं. आपण मोदींच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्रात १५०+ जागा जिंकल्या असत्या. युती केली हीच चूक झाली ”’
नेमक्या याच वक्तव्याबाबत उदय सामंत यांना प्रतिक्रिया विचारली असता, देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला नाही आणि हीच त्यांची खंत आहे असं म्हटलं आहे.