सातारा तसेच कोल्हापूरच्या ‘राजां’नी घेतलेल्या भूमिकांचा वेगळा अर्थ कोणी काढू नये. छत्रपती शिवरायांनी कष्ट व शौर्यातून निर्माण केलेले हे महाराष्ट्र राज्य जातीपातीच्या लढाईत फाटू नये याची काळजी सगळ्यांनीच घेतली पाहिजे. ‘‘जातीला पोट असेल, पण पोटाला जात नसते’’ हे शिवसेनाप्रमुखांचे अजरामर विधान आहे. त्याचाही अर्थ यानिमित्ताने समजून घेतला पाहिजे असे मत शिवसेनेने सामना संपादकीयच्या माध्यमातून व्यक्त केले आहे. पण याप्रश्नी नक्की कोणाला ठोकायचे याचे उत्तर मिळायला हवे असेही शिवसेनेने म्हटले आहे.
“मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर सगळ्याच समाजांचे आरक्षण रद्द करा, असे भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी ठणकावले आहे. त्याच वेळी कोल्हापूरचे छत्रपती खासदार संभाजीराजे यांनी ‘सातारकरां’पेक्षा वेगळी भूमिका घेतली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आड येणाऱ्यांना ठोकून काढा, असे संभाजीराजे यांनी साफ सांगितले आहे. उदयनराजे व संभाजीराजे हे छत्रपतींच्या गादींचे वारसदार आहेत व मराठा आरक्षणाच्या लढ्यात दोन्ही ‘राजे’ आघाडीवर आहेत. या दोन भूमिकांमुळे सातारा व कोल्हापूरकर घराण्यांत आरक्षणाबाबत वाद आहेत किंवा लढाईत फूट पडली आहे असे जे पसरवले जात आहे ते खरे नाही. या ज्यांच्या त्यांच्या स्वभावाच्या ठिणग्या आहेत,” असं शिवसेनेने म्हटले आहे.
“सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकले नाही. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिल्याने राज्य सरकारच्या सर्व मेहनतीवर पाणी पडले. राज्यातील विरोधी पक्षांचे लोक त्याचे खापर सध्याच्या सरकारवर फोडत असतील तर ते सकल मराठा समाजाशी द्रोह करीत आहेत. ही वेळ एकमेकांवर दोषारोप करण्याची नाही, तर एकमेकांच्या मांडीस मांडी लावून, खांद्यास खांदा भिडवून मराठा तसेच धनगर समाजाच्या आरक्षणाचा गुंता सोडवण्याची आहे,” असे शिवसेनेने सांगितले आहे.
“भाजपा नेत्यांनी हा प्रश्न घेऊन पंतप्रधान मोदींचे मन वळवायला हवे. सध्या मोदी यांनी मनात आणले तर अशक्य ते शक्य होण्याचा कालखंड आहे, पण ‘मराठा आरक्षणाची कोंडी फोडण्यासाठी वेळ द्या’ असे पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवूनही वेळ मिळत नसेल तर राज्यातील भाजप पुढाऱ्यांना महाविकास आघाडीस दोष देण्याचा अधिकार नाही,” असे प्रत्युत्तर शिवसेनेने दिले आहे.
“छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जाती व बारा बलुतेदार अशा बहुजन समाजाला एकत्र केले. आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाने एकत्र येऊन लढा दिला पाहिजे, असे खासदार संभाजीराजे सांगत आहेत. मराठा समाज राजकीय झेंडे बाजूला ठेवून एकवटल्यानेच क्रांती झाली. पुन्हा धनगर, आदिवासी, इतर मागास वर्गाच्या तोंडचा घास काढून आपल्याला काहीच नको असे मराठा समाजाचे सांगणे आहे. सरकारने जे केले ते सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले नाही. त्यामुळे समाजात निराशा आणि वैफल्य आले आहे व त्याच उद्विग्नतेतून सातारचे छत्रपती उदयनराजे यांनी सगळ्यांचेच आरक्षण रद्द करा, गुणवत्तेनुसार मेरिटवर सर्वांची निवड करा अशी भूमिका घेतली. मराठा समाजाची आर्थिक स्थिती बरी नाही, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळूनही वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश नाही की नोकऱ्यांत प्राधान्य नाही. त्यामुळे मराठा समाजातील मुलांना नैराश्य येत असल्याचे खासदार उदयनराजे यांचे मत आहे. येथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. कोल्हापूर तसेच सातारच्या छत्रपतींनी आता घेतलेल्या भूमिका या मूळच्या शिवसेनेच्याच आहेत. हात जोडून न्याय मिळत नसेल तर हात सोडा, अन्याय करणाऱ्यांना ठोकून काढा असे संभाजीराजे म्हणतात. ही भूमिका शिवसेनेचीच आहे, पण याप्रश्नी नक्की कोणाला ठोकायचे याचे उत्तर मिळायला हवे,” अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
“मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर ढोल वाजविले ते कशासाठी? पवार हे स्वतः मराठा समाजाचेच प्रतिनिधी आहेत व फडणवीसांचे सरकार राज्यात असताना पवार मराठा मोर्चात सामील झाले होते. 10 ऑक्टोबरला सर्व संघटनांनी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. येथे मराठा आरक्षणाचे आंदोलन पेटले असतानाच धनगर समाजही रस्त्यावर उतरला आहे. त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही, तर मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नसल्याचे धनगर समाजाच्या नेत्यांनी सांगितले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर छत्रपती उदयनराजे यांचे ‘‘सगळ्यांचे आरक्षण रद्द करा व गुणवत्ता, आर्थिक निकष हाच निवडीचा आधार ठेवा’’ असे सांगणे हे क्रांतिकारक आहे. शिवसेनाप्रमुखांनी अनेकदा गुणवत्ता आणि आर्थिक निकष हीच भूमिका मांडली. अर्थात, बदलत्या परिस्थितीत मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण मिळायलाच हवे अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही घेतली आहे,” अशी माहिती शिवसेनेने दिली आहे.