भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांना सोयीस्करपणे राजकारणातुन डावलण्यात आल्याचे आरोप खुद्द त्यांनीच काही भाजप नेत्यांवर लावले होते. यानंतर अनेक वेळा देवेंद्र फडणवीस यांच्यावर असलेल्या नाराजीची खदखद त्यांनी माध्यमांमध्ये व्यक्त केली होती. मात्र, भाजप पक्षाला अडचणीच्या काळात उभारी देणाऱ्या नेत्यांपैकी एक असल्याने पुन्हा सक्रिय होण्याची संधी मिळेल या आशेवर एकनाथ खडसे अजूनही भाजपमध्येच आहेत.
गेल्या आठवड्यात भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यामध्ये भाजपच्या नाराज नेत्या पंकजा मुंडे व विनोद तावडे यांना राष्ट्रीय सचिव पदी नियुक्त करून राजकीय पुनर्वसनाचा प्रयत्न केला गेला मात्र दुसऱ्याबाजूला एकनाथ खडसेंना डावलण्यात आल्याने त्यांनी पक्ष सोडून योग्य निर्णय घ्यावा अशा मागणीचा जोर समर्थकांनी लावला आहे. खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं आहे.
अशातच, माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मोठा गौप्यस्फोट केला आहे. “ज्येष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक एकनाथ खडसे यांच्या आदेशाने आणि सल्ल्याने मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला” असं विधान पाडवी यांनी केल्यानंतर पुन्हा एकदा खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं निश्चित आहे, अशा चर्चांना उधाण आलं आहे.