फडणवीस सरकारने राज्यातील जनतेचा विश्वासघात केला, मी कागदोपत्री सिद्ध करून दाखवेन! – सचिन सावंत
फडणवीस सरकारने मुंबईकरांचा विश्वासघात केला आणि हे मी कागदोपत्री सिद्ध करुन दाखवेल, असा दावा सचिन सावंत यांनी केला आहे. मेट्रो कारशेड प्रकल्प कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. त्यानंतर राज्य सरकारनं प्रस्तावित केलेली जागा केंद्राची असल्याचं पत्रच केंद्र सरकारकडून राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवण्यात आलं. त्यानंतर भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असा जोरदार सामना सध्या पाहायला मिळत आहे.
‘मेट्रो कारशेडच्या जागेबाबत केंद्र सरकारनं राज्याला पत्र पाठवण्यामागं हीन राजकारण आहे. त्या जागेवर १९६९ पासून राज्य सरकारचा अधिकार आहे. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुनच केंद्र सरकार आता या जागेवर दावा सांगत आहे’, असा आरोप सावंत यांनी केला आहे.
कांजूरमार्गची जागा घेण्यासाठी ५ हजार २०० कोटी रुपये भरा असं कोर्टानं सांगितल्यांचं फडणवीस म्हणतात. पण तसं काही नसताना हे पैसे कुणाला देण्याची भाषा फडणवीस बोलत होते? असा सवालही सचिन सावंत यांनी विचारला आहे. उलट या जागेमुळं मोठ्या प्रमाणात खर्च वाचणार असल्याचा दावाही सावंत यांनी केला आहे.