Skip to content Skip to footer

शरद पवारांना छोटे नेते म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना राऊतांनी सुनावले….!

“याच छोट्या नेत्याचा सल्ला घेऊन मोदी गुजरात आणि देशाचा कारभार करत होते”

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. शरद पवारांना जे छोटे नेते बोलत आहेत त्यांना पवार साहेबांच्या राजकारणाची उंची पाहणं झेपलेलं नाही अशी टीका त्यांनी केली आहे. सोबतच याच छोट्या नेत्याचा अनेक वर्ष नरेंद्र मोदी सल्ला घेऊन गुजरात आणि देशाचा कारभार करत होते, आजही करत असावेत असंही ते म्हणाले आहेत. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत यांना चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेसंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “शरद पवारांना जे छोटे नेते बोलत आहेत त्यांना पवार साहेबांच्या राजकारणाची उंची पाहणं झेपलेलं नाही. इतक्या छोट्या नेत्याला मोदी यांच्या सरकारने भारतरत्न नंतरचा सर्वात मोठा नागरी सन्मान दिला आहे. सामाजिक, राजकीय आणि कृषी क्षेत्रालीत महान योगदानासाठी हा पुरस्कार दिला आहे. हे चंद्रकांत पाटील यांना माहिती नसावं. माहिती नसेल तर पीएमओकडून माहिती घ्यावी”.

“याच छोट्या नेत्याचा अनेक वर्ष नरेंद्र मोदी सल्ला घेऊन गुजरात आणि देशाचा कारभार करत होते, आजही करत असावेत. बहुदा चंद्रकांत पाटील आणि भाजपामध्ये वैचारिक दरी निर्माण झाली आहे. किंवा मोदी सांगत आहेत तो संदेश यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. किंवा मोदींना हे जुमानत नाही असं दिसत आहे. तुम्ही राजकारण करा पण वैयक्तिक स्तरावर उत्तुंग व्यक्तिमत्व आहेत त्यांच्याबद्ल इतक्या खालय्चा स्तरावर येऊन बोलू नका,” असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटील काय बोलले होते –
“राजकारणात येण्यापूर्वी मला पवार मोठे नेते वाटायचे, मात्र राजकारणात आल्यावर कळाले ते खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो,” अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विनाश काले, विपरीत बुद्धी म्हणावं लागेल, अशा शब्दात संताप व्यक्त केला आहे.

स्पष्टीकरण काय दिलं आहे-
“मला पवार साहेबांबद्दल चुकीचं बोलायचं नव्हतं. पण तुम्ही मोदींवर, शाहांवर बोलता ते चालतं. देवेंद्र फडणवीस यांना टरबूज्या म्हणता ते चालतं, मला चंपा म्हणतात ते चालतं का?,” अशी विचारणा चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

“मी कुठल्याही ट्रोलिंगला घाबरत नाही. सत्ताधारी पक्षातील ओबीसी नेत्यांकडून याबाबत भीती निर्माण केली जाते आहे. कालच्या ओबीसी मेळाव्यात यासंदर्भात बोलताना मला कुणाचा अनादर करायचा नव्हता. पण तुम्ही मोदींबद्दल आणि माझ्याबद्दल बोलतात ते चालतं का? मी उद्धव ठाकरेंबद्दलही बोलतो. त्याबद्दल कधी शिवसेना बोलली नाही, राजकारणात असं बोललं जातं. मी माझी बाजू मांडली, माझ्या दृष्टीने हा विषय संपला, त्यांना यावर बोलायचं असेल तर बोलू दे!” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

Leave a comment

0.0/5