Skip to content Skip to footer

‘सूडानेच वागायचं असेल तर तुम्ही एक सूड काढा, आम्ही दहा सूड काढू!’ – उद्धव ठाकरे

‘सूडानेच वागायचं असेल तर तुम्ही एक सूड काढा, आम्ही दहा सूड काढू!’ – उद्धव ठाकरे

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचनालयाने मंगळवारी सकाळी धाड टाकली होती. आमदार सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयावर देखील छापा टाकण्यात आला होता. तसेच त्यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विंहग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचे पथक पोहोचले होते. त्यात विहंग सरनाईक यांना ईडीने ताब्यात घेऊन तब्बल सात तास चौकशी केली होती. मात्र सरनाईक यांच्यावर करण्यात आलेली कारवाई ही सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे, असे सांगण्यात येत आहे.

त्यानंतर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या नेत्यांची यादी अर्थमंत्रालयाकडे सोपवणार आहे, असा इशारा दिला होता. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीदिनी ‘सामना’ला दिलेल्या रोखठोक मुलाखतीत याबाबत भाष्य केलं आहे. ‘सरकारने एक वर्ष पूर्ण केले. सरकार आज पाडू, उद्या पाडू असे बोलले त्यांचेच दात या काळात पडलेत!’, असा दणकाच मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला विरोधकांना दिला. मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रदीर्घ मुलाखतीत सर्वच प्रश्नांना उत्तरे दिली.

‘मी शांत आहे, संयमी आहे. पण याचा अर्थ मी काही नामर्द नाही आणि ज्या पद्धतीने आमच्या लोकांच्या कुटुंबीयांवर हल्ले सुरू झाले आहेत ही पद्धत निदान महाराष्ट्राची तरी नाही. नक्कीच नाही. एक संस्कृती आहे. हिंदुत्ववादी म्हटल्यावर एक संस्कृती आहे आणि तुम्ही कुटुंबीयांवर येणार असाल, मुळाबाळांवर येणार असाल तर आमच्या अंगावर येणाऱ्यांना, ज्यांना ज्यांना कुटुंब आणि मुलंबाळं आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की, तुम्हालाही कुटुंब आणि मुलंबाळं आहेत. तुम्ही धुतले तांदूळ नाहीत. तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्ही शिजवू शकतो.’

‘तुम्ही सीबीआयचा दुरुपयोग करायला लागलात तेव्हा अशी वेसण घालावीच लागते. ईडी काय, सीबीआय काय त्यावर राज्याचा अधिकार नाही? आम्ही देतो ना नावं, आमच्याकडे आहेत नावं. मालमसाला तयार आहे. पूर्ण तयार आहे. पण सूडाने जायचं का? मग जनतेने आपल्याकडून काय अपेक्षा ठेवायची. सूडानेच वागायचं असेल तर तुम्ही एक सूड काढा, आम्ही दहा सूड काढू!’, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

Leave a comment

0.0/5