औरंगाबाद नामांतर : फडणवीसांच्या टीकेला डॉ नीलम गोऱ्हे यांचे उत्तर
औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर मुद्यावरून राजकारण चांगलेच तापू लागले आहे. त्यात मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नामांतर विरोधात वक्तव्य केल्यानंतर भाजपाने काँग्रेस आणि सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षावर जोरदार टीका केली होती. त्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा सेनेला नाटक कंपनी म्हणत चिमटा काढला होता. आता फडणवीसांच्या या टीकेला शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी प्रतिउत्तर दिले आहे.
पुण्यात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.गोऱ्हे म्हणाल्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसेना प्रमुख देखील असून महाविकास आघाडीतील घटक आहे. त्यामुळे औरंगाबादकरांना विश्वासात घेऊन योग्य वेळी योग्य निर्णय ते नक्की घेतील. मात्र काही लोक नामांतराच्या मुद्द्याचा वापर करत समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. औरंगाबाद शहराचे संभाजीनगर नामांतर करणे हा मुद्दाच मुळात वादाचा नाही. आणि शिवसेनेने याआधीच संभाजीनगर नावाचा प्रस्ताव ठेवलेला आहे.
माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचा नाटक कंपनी असा उल्लेख करत टीकेला नीलम गोऱ्हे यांनी यावेळी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या, सत्ताधारी पक्षावर टीका करणे हे विरोधी पक्षाचे कामच असते. त्यांनी टीका केली नाही तर ते आमच्याच नाटक कंपनीतले एक पात्र समजले जातील. आम्ही नाटक कंपनी असलो तरी ते प्रेक्षकांची भूमिका चांगली निभावत आहे. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रधर्माचे पालन करत आमच्यावर टीका करत राहावी.आम्ही आमचे काम करत राहणार आहोत असा टोला लगावला.