Skip to content Skip to footer

जावयाच्या चुकीची शिक्षा सासऱ्याला का व्हावी – जयंत पाटील

जावयाच्या चुकीची शिक्षा सासऱ्याला का व्हावी – जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना ड्रग्ज प्रकरणात झालेल्या अटकेनंतर विरोधकांनी मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही मागणी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली आहे. ‘जावयानं काही गुन्हा केला असेल तर कायद्यानं योग्य ती कारवाई होईल. त्याच्या चुकीची शिक्षा सासऱ्यानं का भोगावी असा प्रतिप्रश्न पाटील यांनी केला आहे.

मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. धनंजय मुंडे यांच्यावर झालेले बलात्काराचे आरोप व नवाब मलिक यांच्या जावयाच्या अटकेवर पत्रकारांनी जयंत पाटलांवर प्रश्नांची सरबत्ती केली. पाटील यांनी सर्व प्रश्नांना स्पष्ट उत्तरं दिली. ‘नवाब मलिक यांच्या जावयानं काही गुन्हा केला असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे. त्यांना कशाच्या आधारे अटक केली आहे हे मला माहीत नाही. चौकशीतून सर्वकाही स्पष्ट होईल व पुढील कारवाई होईल. त्यात राज्य सरकारचा हस्तक्षेप करणार नाही आणि तसाही प्रश्नच येत नाही,’ असं पाटील म्हणाले. मात्र, ‘जावयाचं कुटुंब स्वतंत्र असतं. जावयानं काही गुन्हा असेल तर सासऱ्याच्या राजकीय कारकीर्दीवर परिणाम होण्याचं कारण नाही असेही पाटील म्हणाले.

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दलही जयंत पाटील यांनी भूमिका मांडली. ‘भाजप हा विरोधी पक्ष आहे. राजीनामा मागणं हे त्यांचं काम आहे. मुंडे यांच्यावरील आरोपांच्या संदर्भात पक्षपातळीवर चर्चा केली जाईल. गरज भासल्यास मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल. मात्र, केवळ कोणी आरोप केले म्हणून राजीनामा घेतला जाईल असं होणार नाही. त्याबाबत सर्व बाजू पुढं आल्यानंतरच निर्णय होईल,’ असं पाटील म्हणाले

Leave a comment

0.0/5