Skip to content Skip to footer

खासदार संजय राऊत म्हणाले, “फडणवीस उत्तम वकील आणि वाकिलांवर काय आरोप होतात हे सगळ्यांना माहित आहे”

महाराष्ट्र बुलेटिन : राज्यात सध्या राजकीय घडामोडींनी वातावरण तापलेल्या अवस्थेत आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून बदली केलेल्या परमवीर सिंग यांच्या पत्रानंतर विरोधी पक्षाने सरकार पुढे प्रश्नांचा भडीमार केला आहे. सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्याच्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वाझेंना सेवेत घेण्यास सांगितलं होतं, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं होतं. दरम्यान फडणवीसांच्या या विधानावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी याचं उत्तर दिलं आहे.

संजय राऊत म्हणाले की, “ईडी येऊ द्या किंवा ईडीचे पिताश्री येउद्या, बाप हा शब्द मी मुद्दाम वापरत नाही. जो तपास करायचा तो खुशाल करा. ईडी, सीबीआय, एनआयची मुख्यालये मुंबईमध्ये आणायची असतील तर आणा, बीकेसीमध्ये त्यांना आम्ही चांगल्या ठिकाणी जागा देऊ. तसं ही त्यांना दिल्लीत काम नाहीये. एका फौजदाराला घ्यावं की नाही घ्यावं याचा निर्णय मुख्यमंत्री घेत नसून हा निर्णय सिस्टीम घेत असते. देवेंद्र फडणवीस काहीही बोलतात, त्यामुळे त्यांच्या वक्तव्यांना गांभीर्याने घेऊ नये. ते उत्तम वकील आहेत. त्यांनी कायद्याचा अभ्यास केला आहे. तुम्हाला माहीतच असेल की, न्यायालयात वकील केस कशी मांडतात. वकिलांवर काय आरोप होतात?,” असा टोला त्यांनी फडणवीसांना लगावला.

तसेच ते पुढे म्हणाले की, “विरोधी पक्ष हे प्रश्न विचारणार आणि त्यांना आम्ही उत्तर देणार, ही प्रक्रिया निरंतर चालू राहणार. कालपर्यंत परमवीर सिंग यांच्यावर विरोधी पक्षाला अजिबात विश्वास नव्हता. मात्र, आज चित्र वेगळं आहे, त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन सरकारची प्रतिमा मलिन करण्याचं काम विरोधी पक्ष करत आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा हा देशासमोरील किंवा राज्यासमोरील एकमेव प्रश्न नाही. चौकशी करून यावर योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. केंद्रातील अनेक मंत्र्यांवर देखील आरोप आहेत. विरोधी पक्षाच्या मागणीनुसार जर सगळ्यांचेच राजीनामे घेतले, तर सरकार कसे चालवणार”, असा प्रश्न देखील संजय राऊतांनी उपस्थित केला.

Leave a comment

0.0/5