ब्रिस्टॉल, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात श्रीलंकेला न्यूझीलंडपुढे शरणागती पत्करावी लागली. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी तिखट मारा करत श्रीलंकेच्या डावाला खिंडार पाडले. त्यामुळे श्रीलंकेला प्रथम फलंदाजी करताना १३६ धावा करता आल्या. या आव्हानाचा सहजपणे पाठलाग न्यूझीलंडने केला. न्यूझीलंडच्या कॉलिन मुनरो आणि मार्टिन गप्तिल यांनी अर्धशतके झळकावत संघाला १० विकेट्स राखून विजय मिळवून दिला.
न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत श्रीलंकेचा १३६ धावांत खुर्दा उडवला. श्रीलंकेकडून दिमुथ करुणारत्नेने नाबाद ५२ धावा केल्यामुळेच श्रीलंकेला शतकाची वेस ओलांडता आली. न्यूझीलंडकडून हेन्री आणि फर्ग्युसन यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले.
श्रीलंका संघाची वर्ल्ड कप स्पर्धेतील सुरुवात काही ठिक झालेली नाही. न्यूझीलंडच्या जलद माऱ्यासमोर त्यांचे सहा फलंदाज अवघ्या 60 धावांवर माघारी परतले आहेत. नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. गोलंदाजांनीही कर्णधार केन विलियम्सनचा हा निर्णय योग्य ठरवला. मॅट हेन्री आणि लॉकी फर्ग्युसन यांनी अनुक्रमे 3 व 2 विकेट घेत श्रीलंकेची त्रेधातिरपीट उडवली. एकीकडे निम्मा संघ माघारी परतला असताना दिमुख करुणारत्ने खिंड लढवत होता. पण, त्यालाही नशीबाची साथ मिळाली. सामन्याच्या सहाव्याच षटकात त्याची दांडी गुल झाली होती. पण, तरीही तो मैदानावर खेळत राहिला.
प्रथम फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेला पहिल्या षटकातच धक्का बसला. लाहीरू थिरीमाने ( 4) दुसऱ्याच चेंडूवर पायचीत होऊन माघारी परतला. त्यानंतर आलेल्या कुशल मेंडिसलाही ( 0) हेन्रीने बाद केले. सहाव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर करुणारत्नेने कट मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चेंडू बॅटीचे चुंबन घेत यष्टिवर आदळला. पण, बेल्स जशाच्या तशा राहिल्या आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंनी डोक्याला हात लावला.