Skip to content Skip to footer

कठीण समय येता, बुमराह कामास येतो – सचिन तेंडुलकर

मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (एमसीजी) उत्कृष्ट गोलंदाजी करणाऱ्या जसप्रीत बुमराहचे सचिन तेंडूलकरने तोंडभरुन कौतुक केले आहे. जेव्हा संघावर कठीण परिस्थिती येते तेव्हा बुमराह कामाला येतो, अशा शब्दांत त्यानं बुमराहच्या खेळीवर समाधान व्यक्त केलं. मेलबर्नमधील शानदार विजयासाठी केवळ अजिंक्य राहणेच्या नेतृत्वाची आणि त्याने ठोकलेल्या शतकाचंच कौतुक न करता सचिनने जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट गोलंदाजी करणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या आक्रमक खेळालाही श्रेय दिलं.

सचिननं म्हटलं, “वेगवान गोलंदाजीच्या विभागात बुमराहने लीडर म्हणून अधिक जबाबदारी सांभाळली. त्याचबरोबर जेव्हापण भारत खेळामध्ये बॅकफूटवर जातो तेव्हा त्याने कायमच चांगला खेळ केला आहे. ही एका चॅंम्पियन गोलंदाजाची ओळख आहे.” एमसीजेमध्ये जेव्हा ऑस्ट्रेलियाचे खेळाडू पहिल्या इनिंगमध्ये १९५ धावांवर सर्वबाद झाले होते. तेव्हा बुमराहने ५६ धावा देत ४ बळी घेतले होते. तर दुसऱ्या इनिंगमध्ये स्टीव स्मिथसह दोन बळी घेतले होते.

दरम्यान, सचिनने मोहम्मद सिराजचेही कौतुक करताना म्हटलं, “आपल्याला सिराजची गोलंदाजी देखील विसरता येणार नाही. ज्या प्रकारे सिराजनं आपलं पहिलं षटक टाकलं आणि त्यानंतर हळूहळू आपल्या गोलंदाजीचा स्तर उंचावला, यावरुन असं आजिबात वाटत नव्हतं की, तो आपला पहिला कसोटी सामना खेळत होता.”

अजिंक्य रहाणेने खूपच चांगली फलंदाजी केली. तो शांत, सहज आणि संतुलित होता. त्याचा निश्चय आक्रमक होता. मात्र, त्याने शांत मनस्थितीत चांगल्या प्रकारे संतुलित खेळ केला. त्यामुळे जेव्हा सीमापार चेंडू टोलवण्याची संधी त्याला मिळाली त्याने ती सोडली नाही. तसेच जिथं संयम दाखवण्याची संधी होती तर तिथंही रहाणेनं चांगली कामगिरी केली. भारतीय संघाच्या विजयामागची तीन प्रमुख कारण सांगताना यामध्ये सहाव्या स्थानावर आलेला पंत, सातव्या स्थानावरील जडेजा आणि आठव्या स्थानी आलेल्या अश्विनच्या फलंदाजीचाही समावेश असल्याचं सचिननं म्हटलं आहे.

Leave a comment

0.0/5