Skip to content Skip to footer

पाणीपुरवठा बंद; सिडको महापालिका कार्यालयात तीन अधिकाऱ्यांना डांबले, शिवसेनेचा ठिय्या

सिडकोतील प्रभाग क्रमांक 28 मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून विस्कळीत असलेल्या पाणीपुरवठ्याकडे दुर्लक्ष करून दोन दिवसांपासून पाणीपुरवठाच बंद केल्याने रहिवाशी संतप्त झाले. शेकडो महिलांसह शिवसेना नगरसेविका सुवर्णा मटाले व नगरसेवक दीपक दातीर यांनी ठिय्या आंदोलन केले. तीन अधिकाऱ्यांना तासभर कार्यालयात डांबून ठेवले.

सिडकोच्या प्रभाग क्रमांक 28 मधील जाधव संकुल, मयुर हॉस्पिटल परिसर, सिद्धटेकनगर, विशाल पार्वâ, विखे पाटील नगर, वृंदावननगर, डीजीपीनगर या परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत आहे. अधिकाऱ्यांकडे नगरसेवकांनी वारंवार तक्रारी करूनही त्यात सुधारणा झाली नाही. याउलट दोन दिवसांपासून पाणीपुरवठाच बंद करण्यात आला होता. यामुळे परिसरातील महिलांनी शिवसेना नगरसेविका सुवर्णा मटाले यांच्याकडे धाव घेतली. त्यांच्यासह शेकडो महिला, मुले हे सिडको विभागीय कार्यालयात गेले. विभागीय अधिकारी सुनीता कुमावत यांच्याशी संपर्क साधला असता आचारसंहितेच्या बैठकीचे कारण दाखवून त्या कार्यालयात आल्याच नाहीत.

यामुळे महिलांनी प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. विभागीय अधिकाऱ्यांच्या दालनात पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता दौलत घुले, शाखा अभियंता गोकुळ पगारे, कनिष्ठ अभियंता ललित भावसार हे हजर होते. विभागीय अधिकारी चर्चेसाठी येत नाही, तोपर्यंत या अधिकाऱ्यांना कार्यालयाबाहेर जावू दिले जाणार नाही, अशी भूमिका महिलांनी घेतली. नगरसेविका मटाले यांनी विभागीय अधिकाऱ्यांच्या दालनाला टाळे ठोकले आणि ठिय्या आंदोलन सुरू केले.

शिवसेनेचे नगरसेवक दीपक दातीर हेही या आंदोलनात सहभागी झाले. प्रशासनाची धावपळ उडाली. अभियंता पी. बी. चव्हाण हे विभागीय कार्यालयात हजर झाले. पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Leave a comment

0.0/5