Skip to content Skip to footer

lok sabha 2019 – गोव्यात नेत्यांची पोस्टर्स हटवण्यास सुरुवात

लोकसभेच्या गोव्यातील दोन मतदारसंघांसाठी आणि विधानसभेची पोटनिवडणूक असलेल्या तीन मतदारसंघांसाठी एकाच वेळी 23 एप्रिल रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे. लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच 10 मार्चपासून गोव्यातही आचारसंहिता लागू झाली आहे. त्यानंतर काल सायंकाळपासून राजकीय पक्षांची पोस्टर्स आणि होर्डिंग्ज हटवण्यास सुरुवात झाली आहे.

गोव्यातील उत्तर व दक्षिण गोवा या लोकसभेच्या दोन मतदारसंघांबरोबरच पोटनिवडणूक असलेल्या मांद्रे, शिरोडा व म्हापसा या तीन विधानसभा मतदारसंघांतही निवडणूक होणार आहे. एकाच वेळी या पाचही जागांसाठी मतदान होणार आहे.

4 हजार 886 मतदारांची भर
मतदार यादी फेररचना कार्यक्रमामुळे 4 हजार 886 मतदारांची यादीत भर पडली आहे. जानेवारी 2019 मध्ये मतदार यादी फेरआढावा घेण्यात आला होता. अगोदर मतदार संख्या 11 लाख 26 हजार 732 एवढी होती. अजूनही ज्या मतदारांना मतदार यादीत आपल्या नावाचा समावेश करायचा असेल त्याचा 4 एप्रिलपर्यंत समावेश केला जाणार आहे. मात्र त्यासाठी दहा दिवस अगोदर अर्ज करणे आवश्यक आहे. 25 मार्चपर्यंत येणाऱ्या अर्जावर निवडणूक आयोग विचार करणार आहे.

पोटनिवडणूक होत असलेल्या म्हापसा मतदारसंघात मतदारांची संख्या 29 हजार 103 एवढी आहे. मांद्रे मतदारसंघात मतदारांची संख्या 32 हजार 129 एवढी तर शिरोडा मतदारसंघात मतदारांची संख्या 28 हजार 919 एवढी आहे. गोव्यात सर्वाधिक मतदार वास्को मतदारसंघात असून तेथे 34 हजार 640 एवढी आहे तर सांतआंद्रे मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे 20 हजार 929 एवढे मतदार आहेत. देशाच्या विविध भागांत किंवा विदेशात मिळून 276 मतदार आहेत. शारीरिकदृष्टय़ा विकलांग असलेल्या मतदारांची संख्या 5,046 एवढी आहे. एकूण 1,652 मतदान केंद्रे असून या सर्व मतदान केंद्रांवर व्हील चेअरची सुविधा उपलब्ध असणार आहे.

आचारसंहिता भंगाची ऍपद्वारेही दखल
निवडणूक आचारसंहिता भंग करणाऱ्या विरोधात कडक कारवाई केली जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या ऍपची सुविधा उपलब्ध आहे. आचारसंहिता भंग करणाऱ्याचा मोबाईलद्वारे फोटो काढून किंवा व्हिडीओ करून ऍपवर पाठवल्यास कारवाई केली जाणार आहे. त्याचबरोबर टोलफ्री नंबर सुविधाही उपलब्ध असणार आहे. सुविधा ऍप नावानेच ऍप तयार केले असून राजकीय पक्ष व उमेदवार यांच्या सुविधेसाठी हे ऍप वापरता येणार आहे.

लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणूक कार्यक्रमही समान असणार आहे. निवडणुकीची अधिसूचना 23 मार्च रोजी जाहीर होईल. 28 मार्चपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ होणार आहे. 4 एप्रिल ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार आहे. 5 एप्रिल रोजी अर्जांची छाननी होईल व 8 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस असेल. 23 एप्रिल रोजी लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होईल. 23 मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.

तब्बल 75 दिवस आचारसंहिता
गोव्यात 10 मार्च ते 23 मे अशी तब्बल 75 दिवस आचारसंहिता.
राज्यात 11 लाख 31 हजार 618 मतदार
उत्तर गोव्यात एकूण मतदारांची संख्या 5 लाख 54 हजार 72 एवढी आहे तर दक्षिण गोव्यात 5 लाख 77 हजार 546 एवढी मतदारांची संख्या आहे. त्यामुळे राज्यात एकूण मतदार संख्या 11 लाख 31 हजार 618 एवढी आहे.

Leave a comment

0.0/5