हलगीचा कडकडाट, उपस्थितांच्या डोक्यावरील भगव्या टोप्या, शिवसेनेच्या भगव्यासह लहरणारे भाजपा, आरपीआय, रासपचे पंचरंगी झेंडे आणि मान्यवरांची उपस्थिती अशा जल्लोषी वातावरणामध्ये शिवसेना भाजपचे कोल्हापूरचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांचा अर्ज सोमवारी दुपारी दाखल करण्यात आला. अर्ज दाखल करण्यासाठी चंदगड, आजरा, गडहिंग्लज, भुदरगड, राधानगरी तालुक्यातून आणि शहरातून निवडक कार्यकर्त्यांना बोलावण्यात आले होते. त्यामुळे सकाळी १0 पासूनच जयलक्ष्मी सांस्कृतिक हॉलवर गर्दी दिसत होती. हॉलमध्ये एकीकडे भगव्या टोप्या आणि शिवसेनेच्या मफलरचे वितरण सुरू होते. त्यामुळे संपूर्ण कोल्हापूर शहरच जणू भगवमय झालेले दिसून येत होते असे मत वरिष्ठ पत्रकार माध्यमानी सुद्धा बोलून दाखविले होते.
साडे दहाच्या सुमारास संजय मंडलिक या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्यासमवेत फोटो काढण्यासाठी गर्दी उडाली. सव्वा अकरानंतर जयलक्ष्मीमधून सर्वजण बाहेर पडले. ‘जय भवानी,जय शिवाजी’च्या घोषणा देत नेते कार्यकर्ते वातावरण तयार करत होते. यानंतर १०० मीटरच्या अंतरावर आल्यानंतर पालकमंत्री पाटील, सर्व आमदार आणि निवडकांना आत सोडण्यात आले. त्यानंतर मंडलिक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जावून अर्ज भरला. पाऊण तासानंतर अर्ज दाखल करून आल्यानंतर महावीर उद्यानामध्ये थांबलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मंडलिक यांनी आभार मानले होते. रॅलीतून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येताना मध्येच सर्व नेत्यांनी एकत्रित फोटोसाठी पोझ दिली. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘शिवसेना भाजप आरपीआय रासप, शिवसंग्राम युतीचा’ अशी घोषणा दिल्या.
कोल्हापुरच्या लोकसभेच्या जागेला शिवसेना पक्षात जास्त महत्व प्राप्त झालेले आहे. तसेच युतीची पहिली जाहीर सभा सुद्धा कोल्हापुरातील तपोवन मैदानात शिवसेना-भाजपा पक्षाच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पार पडलेली होती. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा कोल्हापुरातील दोन्ही जागेवर भगवा फडकलाच पाहिजे असे सुद्धा बोलून दाखविले आहे. आज कोल्हापुरात एक उच्च शिक्षित आणि पेशाने प्राध्यपक असलेले प्रा. मंडलिक हे लाभल्यामुळे कोल्हापुरातील शिक्षणाचा दर्जा नक्कीच उंचावणार असेच बोलले जात आहे.