Skip to content Skip to footer

कुनीतीचा महामेरू राजू शेट्टी – सदाभाऊ खोत

खासदार राजू शेट्टी याच्या सारखा पाताळयंत्री व कुटनितीचा महामेरु शोधून सापडणार नाही. मला त्यांचा गेल्या दहा वर्षांचा अभ्यास आहे, अशी टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली. त्यांच्यासारखा दलबदलू माणूस मी आयुष्यात पाहिलेला नाही. प्रत्येक वेळी वेगळी भूमिका घेऊन ते सहकाऱ्यांना तोंडावर पाडतात. भविष्यात ते राष्ट्रवादीसोबत राहणार नाहीत, असेही मंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हणाले. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीच्या काळात राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यात संघर्ष वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सदाभाऊ खोत यांनी आज इस्लामपूर येथे बैठक घेतली. यावेळी शिवसेनेचे हातकणंगले मतदार संघाचे लोकसभेचे उमेदवार धैर्यशील माने, वनश्री नानासाहेब महाडिक, आमदार उल्हास पाटील, सी. बी.पाटील, विक्रम पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार, राहुल महाडिक, सम्राट महाडिक उपस्थित होते. खासदार शेट्टींनी लोण्याचा गोळा खाण्यासाठी स्वाभिमानी व काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांच्यात यापूर्वी जोरदार भांडणे लावली. यातूनच त्यांनी आपला मतलब साधला.

त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या व साखर कारखानदारांच्या गळ्यात गळा घातलेल्या शेट्टींना वाळवा- शिराळ्यातील कार्यकर्ते योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असे सुद्धा मत खोत यांनी मांडले होते.

सदाभाऊ खोत म्हणाले, त्यांनी आता निवडणुकीसाठी पैसे मागायचे ढोंग करू नये. ते पैसेवाल्यांच्या बरोबर पैशाच्या ढिगाऱ्यात बसले आहेत. त्यांचे मन साफ नाही. संघटनेच्या लोकांना वापरून फेकून देणे हा त्यांचा एक कलमी कार्यक्रम आहे. खोटे फार काळ लपून राहत नाही. त्यामुळे गेल्या दहा वर्षात त्यांची चाल लोकांच्या लक्षात आली आहे. यावेळी ते कारखानदारांच्या गळ्यात गळा घालून बसल्याने त्यांचा पराभव निश्चित आहे. आमची विकास आघाडी म्हणजे बारा बैलांच्या नांगरा सारखी आहे. औत ओढताना एखादा बैल मागे पुढे बाजूला चालतो. मात्र सर्वजण शेत नांगरण्याचे काम करतात. त्याचप्रमाणे आमच्यातील एखादा इकडे-तिकडे असला तरी शिवसेनेचे धेर्यशील मानेंना निवडून आणण्याचे काम ते करणार यात शंका नाही.

Leave a comment

0.0/5