Skip to content Skip to footer

मुंबई मनपाच्या 10 शाळांमध्ये सीबीएसई बोर्ड, प्रवेश कधी आणि कसे मिळणार?

आज आपल्या पाल्याला चांगले आणि उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून प्रत्येक पालक प्रयत्न करत असतात. त्यात आपल्याकडे मुंबई महानगरपालिकेच्या शाळेचे शिक्षण म्हटले की, आज पालकवर्ग मुलांना तिथे टाकण्यास तयार होत नाही. घरकाम करणाऱ्या किंवा आर्थिक कुवत नसणाऱ्यांसाठी शासनाने केलेली शिक्षणाची सोय म्हणून त्याकडे बघितले जाते. त्यामुळे मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय कुटुंब या शाळांकडे कटाक्षाने दुर्लक्ष करतात.

शाळेतील शिक्षक, शिक्षणाचा दर्जा, शाळांची स्थिती, विद्यार्थ्यांवर होणारे संस्कार या सर्व बाबींमुळे अनेक पालक आपल्या मुलांना मोठमोठ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळेत घालतात. अनेकांना या शाळांची फी देखील परवडत नाही. पण आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित व्हावं, इतकाच यामागे विचार असतो. या सर्व गोष्टी विचारात घेऊन मुंबई महापालिकेने पालिकेच्या दहा शाळांमध्ये लवकरच सीबीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात अदयावत आणि दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी पालिकेतर्फे विविध प्रयोग केले जातात. त्याच पार्श्वभूमीवर येत्या २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून पालिका प्रशासन सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरु करणार आहे. या नव्या सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये ज्युनियर केजी (शिशुवर्ग), सिनीयर केजी (बालवर्ग) आणि पहिली ते सहावीपर्यंतच्या प्रत्येक वर्गाची एक तुकडी असणार आहे. यानंतर टप्प्याटप्प्याने हे वर्ग दहावीपर्यंतचे वाढवले जाणार आहेत.

येत्या २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून पालिकेच्या सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये प्रवेश दिले जाणार आहेत. या शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ९० टक्के प्रवेश सोडत (लॉटरी) पद्धतीने काढले जाणार आहे. ते विनाशुल्क असणार आहेत. तर ५ टक्के प्रवेश हे महापौरांच्या शिफारशीनुसार आणि पाच टक्के प्रवेश पालिका कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.

पालिकेचा विभाग – शाळा

जी– उत्तर – भवानी शंकर रोड शाळा
एफ – उत्तर – काणे नगर मनपा शाळा
के – पश्चिम – प्रतीक्षा नगर मनपा शाळा
एल – तुंगा क्हिलेज, नवीन इमारत
एन – राजावाडी मनपा शाळा
एम – पूर्व 2 – अझीझ बाग मनपा शाळा
पी– उत्तर – दिंडोशी मनपा शाळा
पी – उत्तर – जनकल्याण नवीन इमारत
टी – मिठानगर शाळा, मुलुंड
एस – हरियाली क्हिलेज, मनपा शाळा, विक्रोळी

Leave a comment

0.0/5