Skip to content Skip to footer

‘कॅराव्हॅन’ पर्यटन धोरणाबद्दल सर्वकाही

 

पर्यटन धोरण- २०१६ मधील तरतूदीनुसार आणि कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे पर्यटक सध्या सुरक्षित पयर्टनाच्या दृष्टीने खाजगी वाहनाने प्रवास करण्याला प्राधान्य देत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. हे पाहता बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कॅराव्हॅन व कॅराव्हॅन पार्क या सुविधा पर्यटकांना उपलब्ध करुन देण्यासाठी कॅराव्हॅन पर्यटन धोरण राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे, त्यामुळे पर्यटन प्रेमींना दिलासा मिळाला आहे. या निर्णयाबद्दल पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व संपूर्ण मंत्रिमंडळाचे आभार मानले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पर्यटन विकासाच्या अनुषंगाने कॅराव्हॅन पर्यटन धोरणास मंजुरी देण्यात आल्याने महाराष्ट्राचे सौंदर्य पर्यटकांना अनोख्या पद्धतीने अनुभवता येईल असे देखील आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केले.

कॅराव्हॅन पर्यटन धोरण म्हणजे काय?

सामान्यतः बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडला आहे की कॅराव्हॅन पर्यटन धोरण म्हणजे नेमकं काय? तर त्याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. या धोरणाचे कॅराव्हॅन व कॅराव्हॅन पार्क असे दोन भाग करण्यात आले असून यामुळे राज्यातील निसर्ग सौंदर्याचा लाभ हा सर्व पर्यटकांना घेता येणार आहे. एकूणच काय तर आपल्या राज्याला जे वैविध्यपूर्ण सौंदर्य लाभले आहे, जसे की राज्यातील निसर्गरम्य समुद्र किनारे, ऐतिहासिक किल्ले, पर्वतरांगा, थंड हवेची ठिकाणे, नदी, वनसंपदा, ऐतिहासिक वारसास्थळे, लेणी, धरणे अशी जी अनेक पर्यटनाची ठिकाणे आहेत, येथील पर्यटनाचा लाभ हा प्रत्येक पर्यटकाला घेता यावा. विशेष म्हणजे या धोरणामुळे रोजगार निर्मिती देखील होणार आहे, त्यामुळे बेरोजगारांना रोजगार मिळण्यास देखील हातभार लागणार आहे.

तसेच कॅराव्हॅन पार्क तसेच कॅराव्हॅन पर्यटनाकरीता मुद्रांक शुल्कामध्ये सूट, राज्य वस्तु व सेवा कराचा परतावा, विद्युत शुल्कामध्ये सूट यासारखी प्रोत्साहने लागू केली जाणार आहेत. यासाठी पर्यटन संचालनालयाकडे कॅराव्हॅन व कॅराव्हॅन पार्कची नोंदणी आवश्यक असणार आहे. तसेच पर्यटन संचालनालयामार्फत कॅराव्हॅन व्यावसायिकांना व्यवस्थापन, स्वच्छता आणि मार्केटिंगचे प्रशिक्षण देखील दिले जाणार असल्याचे शासनाने म्हटले आहे. तसेच अतिदुर्गम भागात हॉटेल्स आणि निवासस्थानांसारख्या राहण्याच्या सोयी फार कमी प्रमाणात उपलब्ध असतात, त्यामुळे पर्यटकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्यापासून पर्यटकांना दिलासा मिळणार आहे. तसेच ज्या क्षेत्रामध्ये कायमस्वरूपी बांधकामासाठी प्रतिबंध लावण्यात आले आहेत, अशा ठिकाणी कॅराव्हॅन व कॅम्परव्हॅनच्या साहाय्याने पर्यटकांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, अशा स्वरूपाचे हे धोरण असल्यामुळे याचा पर्यटकांना मोठ्या प्रमाणात फायदाच होणार आहे.

कॅराव्हॅन म्हणजे काय ते जाणून घेऊ…

या व्हॅन्समध्ये पर्यटकांसाठी बेड, किचन, टॉयलेट, सोफा, टेबल इत्यादी निवासाच्या दृष्टीने सोयीस्कर अशा गोष्टींची व्यवस्था केलेली असेल. या कॅराव्हॅनचे विविध प्रकार देखील आपल्याला पाहायला मिळतील, ते म्हणजे सिंगल एक्सेल कन्व्हेंशल कॅराव्हॅन, टि्वन एक्सल कॅराव्हॅन, टेन्ट ट्रेलर, फोल्डिंग कॅराव्हॅन, कॅम्पर ट्रेलर होय. लक्षात घेण्यासारखे म्हणजे परिवहन आयुक्तांकडे या कॅराव्हॅनची नोंदणी करणे आवश्यक असणार आहे. पर्यटन संचालनालयाकडे कॅराव्हॅन पार्क व कॅराव्हॅन तसेच हायब्रीड कॅराव्हॅन पार्कची नोंदणी करावी लागेल. तसेच www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर टूर ऑपरेटरची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करता येईल. यासाठी शुल्क देखील ठरविण्यात आले आहे, यासाठी नोंदणी शुल्क ५ हजार व नुतनीकरणासाठी २ हजार रुपये द्यावे लागतील.

कॅराव्हॅन पार्क म्हणजे काय ते जाणून घेऊ…

यामध्ये पर्यटकांसाठी मुलभूत सोयी सुविधांनी सुसज्ज अशा जागी कॅराव्हॅन पार्क उभी केली जातील, जेणेकरून पर्यटकांना त्या जागी राहता येईल, त्यांना मुक्काम करता येईल आणि अशा रीतीने ते पर्यटनाचा आनंद घेऊ शकतील. विशेष म्हणजे असे पार्क खाजगी किंवा शासकीय जमिनीवर स्वत: जमीन मालक किंवा विकासक देखील उभारु शकण्यास सक्षम असणार आहेत. कॅराव्हॅन पार्क ज्यांच्या मालकीचे असतील त्यांनी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना करणे अपेक्षित असून यामध्ये वाहनतळाच्या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा असणे आवश्यक असणार आहे आणि स्वतंत्र पाणी, स्वच्छतागृहे, रस्ते व वीज देखील उपलब्ध असणे आवश्यक आहे. या ठिकाणी पर्यटक सुविधा केंद्र, उद्यान देखील असणार आहे. यासाठी स्थानिक प्राधिकरणांमार्फत आवश्यक त्या परवानग्या दिल्या जातील. विशेष बाब म्हणजे एमटीडीसीच्या पर्यटक निवासांच्या परिसरात किंवा त्यांच्या मोकळ्या जागेत तसेच कृषी पर्यटन केंद्रांच्या ठिकाणी देखील कॅराव्हॅन पार्क उभारता येणार आहेत.

Leave a comment

0.0/5