पुणे – दहीहंडी, गणेशोत्सवात ध्वनिवर्धकांवर लावण्यात आलेल्या आवाजाच्या मर्यादेचा फटका मुख्यमंत्र्यांना बसणार आहे. 75 डेसिबलपेक्षा जास्त आवाज नको, ही भूमिका मुख्यमंत्र्यांच्या उद्या (ता.12) शनिवारवाड्यावर होणाऱ्या कार्यक्रमातच घेण्याचा निर्णय लाइट, साउंड ऍण्ड जनरेटर असोसिएशनने घेतला आहे. मुख्यमंत्र्यांचा सभेतील “आवाज’ कमी करून आपला “आवाज’ त्यांच्यापर्यंत पोचविण्याचा असोसिएशनचा प्रयत्न यशस्वी होणार का, याकडे आता लक्ष लागले आहे. दहीहंडी, गणेशोत्सवात फक्त दोनच ध्वनिवर्धक लावायचे, 75 डेसिबल पेक्षा जास्त आवाज नको या पोलिसांनी घातलेल्या अटींच्या निषेधार्थ ध्वनी, प्रकाश व्यावसायिकांनी बंद पुकारला आहे. महापालिकेतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी सांस्कृतिक कार्यक्रमांचे उद्घाटन होत आहे. या कार्यक्रमात ध्वनिवर्धकाचा आवाज हा 75 डेसिबलपेक्षा कमी ठेवण्याचा निर्णय या व्यावसायिकांनी घेतला आहे. अवश्य वाचा – ‘दहीहंडी, गणेशोत्सवात साऊंड सिस्टीम देणार नाही’ शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गणपती मंडळांवर पोलिसांकडून विविध प्रकारची बंधने लादली जात असल्याची तक्रार मंडळांकडून होत आहे. त्यातच दहीहंडी, गणेशोत्सवातील कार्यक्रमांना ध्वनी, प्रकाश योजना पुरविणाऱ्या व्यावसायिकांनाही पोलिसांनी “दोनच स्पीकर लावायचे’ अशी तंबी दिली आहे. पोलिसांच्या या आदेशाच्या निषेधार्थ शहरातील “लाइट, साउंड ऍण्ड जनरेटर असोसिएशन’ने दहीहंडी ते गणेशोत्सव काळामध्ये ध्वनी, प्रकाश योजना न पुरविण्याचा निर्णय घेत बंद पुकारला आहे. या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनीच तोडगा काढावा, अशी अपेक्षाही असोसिएशनने व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला ध्वनी व प्रकाश योजना पुरविण्याचे काम कंत्राटी पद्धतीने करण्यात येते. मात्र, पोलिसांचे नियम सगळ्यांना सारखेच आहेत, या कार्यक्रमाचा आवाज नियमानुसार असावा, अशी भूमिका व्यावसायिकांनीच घेतल्याने या कार्यक्रमाचा आवाज सर्वांपर्यंत पोचणार काय? अशी चर्चाही आज रंगली. अधिक माहितीसाठी