Skip to content Skip to footer

एसटीच्या प्रत्येक आगारात साजरा होणार “मराठी भाषा गौरव दिवस”

परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळ अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून एसटीच्या प्रत्येक आगारात मोठ्या थाटा-माटात मराठी भाषा गौरव दिवस साजरा होणार आहे. या संदर्भात राज्याचे परिवहन मंत्री शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी स्वतः पुढाकार घेतलेला आहे. यंदाही एसटीच्या सर्व ५६८ बसस्थानकावर ७० लाख प्रवाशांच्या साक्षीने एसटी कर्मचारी “मराठी भाषा गौरव दिन” साजरा करून मराठी भाषेच्या संवर्धनाचा जागर करणार आहेत. महाराष्ट्रात आज मराठी भाषा बोलण्याचा टप्पा कमी होत चालला आहे. त्यातच मुंबई सुद्धा हिंदी भाषेचा टक्का वाढत असल्याने ही बाब मराठी भाषेसाठी चिंतेची गोष्ट आहे.

एसटीच्या प्रत्येक बसस्थानकावर ठीक ११ वाजता स्थानिक पातळीवरील ज्येष्ठ पत्रकार/मराठीचे प्राध्यापक यांच्या हस्ते एसटी कर्मचारी व प्रवाशांच्या उपस्थितीत कविवर्य कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन होऊन त्यांना अभिवादन केले जाणार आहे. ज्ञानोबा-तुकोबांची माय-माउली असलेली आपली मराठी भाषा, त्यांच्या अभंग आणि ओव्यांनी अधिक समृद्ध झाली आहे. महाराष्ट्रातील अनेक साहित्यिक, कवी, नाटककार, कलावंत, प्राध्यापक, पत्रकार, यांनी आपला सिद्धहस्त लेखणी व वाणीतून या माय मराठीला सातासमुद्रापार नेले आहे. आज त्याच मराठी भाषिकेचा मराठी भाषा दिन साजरी करून एक नवीन आदर्श एसटी महामंडळ निर्माण करत आहे.

आज इंग्रजी भाषेचा पगडा डोक्यावर चढवलेल्या मराठी जनतेला आपल्या मराठी भाषेचा सुद्धा अभिमान असावा या उद्देशाने एसटी महामंडळाने हा उपक्रम हाती घेतलेला आहे. गेली चार वर्ष परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या एसटी महामंडळा तर्फे हा उपक्रम राबविला जात आहे. या प्रसंगी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी भाषीक लोकांनी आपली संक्षिप्त नावे इंग्रजी अद्याक्षराद्वारे न लिहिता, सुस्पष्ट मराठी अद्याक्षरांचा वापर करून लिहावीत, अशा विनंती वजा संदेश सर्व मराठी जणांना एसटीच्या वतीने दिला जाणार आहे. प्रत्येक बसस्थानकावर स्वच्छता राखून सडा-रांगोळी, फुले, तोरण बांधून, आकर्षक कमानी सजवून सर्व प्रवाशी व कर्मचारी बांधवांना “मराठी भाषा गौरव दिनाच्या” शुभेच्छा दिल्या जाणार आहेत. या उपक्रमाचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.

Leave a comment

0.0/5