समोर हातात दगडं घेऊन लोकांचा जमाव उभा. ही आपली मायभूमी नाही याची कूणकूण. विंग कमांडर अभिनंदन यांचं धैर्य. भारतीय हवाई दलाची गोपनीय कागदपत्रे शत्रूच्या हाती लागू नये म्हणून त्यांनी काही कागदपत्रे अक्षरश: चावून गिळली. त्यांच्या याच कृत्याचा संपूर्ण देशाला आता अभिमान वाटतोय.
पुलवामा हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारतीय हवाई सेनेचे विंग कमांडर अभिनंदन हे पाकिस्तानच्या हाती लागले. त्यावेळी त्यांनी दाखविलेल्या अतुलनीय देशभक्तीने संपूर्ण भारत त्यांना सलाम करतोय.
विंग कमांडर अभिनंदन यांना भारताकडं सोपवणार असल्याची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या संसदेत केली.पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग विंग कमांडर अभिनंदनला घ्यायला वाघा सीमेवर जाणार आहेत.
विंग कमांडर अभिनंदन इस्लामबादवरून लाहोरकडे रवाना झाले आहेत. सायंकाळी 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास अभिनंदन वाघा सीमेवर पोहचण्याची शक्यता आहे. यावेळी भारतीय अधिकारी ग्रुप कॅप्टन जेडी कुरियनही त्यांच्यासोबत असतील.