Skip to content Skip to footer

किम-ट्रंप भेट निष्फळ: उत्तर कोरिया – आता चर्चा झाली तरी अण्वस्त्रांविषयी भूमिका बदलणार नाही

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग-उन यांची गेल्या वर्षी सिंगापूर येथे भेट झाल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव निवळेल आणि कोरियन द्वीपकल्प अण्वस्त्रमुक्त होईल, अशी आशा निर्माण झाली होती.

पण व्हीएतनामच्या हनोईमध्ये त्यांच्या दुसऱ्या भेटीनंतर झालेली चर्चा निष्फळ ठरल्यामुळे आता ती आशा धुसर होताना दिसतेय.

“आता यापुढे अमेरिकेने चर्चेचा प्रस्ताव ठेवला तरी आमच्या भूमिकेत काहीही बदल होणार नाही,” असं उत्तर कोरियाचे परराष्ट्र मंत्री री योंग यांनी स्पष्ट केले.

इतकंच नव्हे तर “उत्तर कोरियाने आपल्यावरील सर्व निर्बंध पूर्णपणे हटवावेत, अशी मागणी केलीच नव्हती तर त्यामध्ये अंशतः सूट मागितली होती,” असा दावा री योंग यांनी केला आहे.
“आपल्या प्रस्तावात यंगबियंग अणुसंशोधन केंद्र अमेरिकन पर्यवेक्षकांच्या निरीक्षणाखाली पूर्ण बंद करण्याचाही समावेश होता,” असेही त्यांनी सांगितलं. “सध्या अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यात तयार झालेल्या विश्वासाची पातळी पाहाता अण्वस्त्रं नष्ट करण्यासाठी हा सर्वात मोठा उपाय होता,” असं री योंग यांनी प्रतिपादन केलं.
योंग पुढे म्हणाले, “या बदल्यात आम्ही उत्तर कोरियावरील निर्बंधांत अंशतः सूट देण्याची मागणी करत होतो. या निर्बंधांमुळे आमचे नागरिक आणि अर्थव्यवस्थेला धक्का बसत आहे. उत्तर कोरियाने अण्वस्त्र आणि लांब पल्ल्याच्या रॉकेटसच्या परीक्षणावर कायमस्वरूपी स्थगिती आणण्याचा प्रस्तावही ठेवल्याचं” त्यांनी सांगितलं.

री योंग पुढे म्हणाले, “हनोईसारख्या शिखर परिषदेसारखी दुसरी संधी मिळणं कठीण दिसतंय. जर अमेरिकेने भविष्यात कधी चर्चेचा प्रस्ताव ठेवला तरी आम्ही आमच्या सैद्धांतिक भूमिकेत बदल करणार नाही, आमचे प्रस्ताव बदलणार नाहीत.”

यापूर्वी सिंगापूर येथे झालेल्या परिषदेमध्ये फारसे काही साध्य झाले नसल्याची टीका झाली होती. त्यामुळे हनोई परिषदेमध्ये अण्वस्त्रमुक्तीचा करार होण्यासाठी ट्रंप दबाव आणतील, असं वाटलं होतं.

अण्वस्त्रमुक्तीचा अर्थ दोन्ही देश कसा घेतात, याबद्दल साशंकता आहे.
निर्बंध मागे घेण्यासाठी उत्तर कोरियाने आपल्याकडच्या सर्व अण्वस्त्रांचा त्याग करावा, अशी अमेरिकेने भूमिका पूर्वीच घेतली होती. मात्र ही अट उत्तर कोरियाबरोबरच्या चर्चेमधील अडथळ मानली जाते.

अण्वस्त्रमुक्तीचा काय अर्थ अभिप्रेत आहे, असं ट्रंप यांना 27 फेब्रुवारी विचारलं असता ते म्हणाले, त्याचं उत्तर सोपं आहे, “आपली अण्वस्त्रांपासून सुटका होण्याची गरज आहे.”

ते अमेरिकन शिष्टमंडळाला म्हणाले होते, “हनोई येथे होत असलेल्या चर्चेमध्ये नक्कीच सकारात्मक तोडगा निघेल अशी आशा मला होती. पण करार झाला नाही. पण या चर्चेमुळे मी भविष्याबाबत आशावादी आहे.

Leave a comment

0.0/5