Skip to content Skip to footer

हिंदुस्थानची पाणबुडी पाकिस्तानच्या हद्दीत शिरली; पाकड्यांचा दावा

पुलवामा हल्ल्यानंतर हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असतानाच पाकिस्तानच्या नौदलाने त्यांच्या सागरी हद्दीत हिंदुस्थानची पाणबुडी शिरल्याचा दावा केला आहे. त्याचबरोबर आम्हांला शांतता हवी असल्यानेच हिंदुस्थानच्या पाणबुडीला लक्ष्य केलं नाही अशी फुशारकीही पाकड्यांनी मारली आहे.

दरम्यान, मंगळवारी हिंदुस्थानचे नौदल प्रमुख अॅडमिरल सुनील लांबा यांनी दहशतवादी सागरी मार्गाने घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याचे सांगत हिंदुस्थानी नौदल सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत.

पाकिस्तानने 2016 नंतर हिंदुस्थानची पाणबुडी पाकिस्तानच्या सागरी हद्दीत पाहिल्याची ही दुसरी घटना असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानी नौदलाच्या प्रवक्त्याने एक व्हिडीओ व्हायरल केला असून त्यात दोन्ही देशात शांतता कायम राखण्यासाठीच आम्ही हिंदुस्थानच्या पाणबुडीला लक्ष्य केलं नाही. यावरून आम्हांला शांतत हवी आहे हे स्पष्ट झालं आहे. या घटनेवरून हिंदुस्थाननेही धडा घेत शांतता राखण्यासाठी थोडं झुकावं, अशी भाषा वापरली आहे.

पाकिस्तानी नौदलाने प्रसिद्ध केलेल्या या व्हिडीओमध्ये पाणबुडीचा वरचा भाग दिसत आहे. ज्यावरून ती हिंदुस्थानची पाणबुडी असल्याचा दावा त्यांनी केला आहे. हा व्हिडीओ 4 फेब्रुवारी रोजी रात्री 8.30 च्या दरम्यान काढण्यात आला आहे. हे फुटेज जारी करतानाच आमच्या सागरी क्षेत्राचे रक्षण करण्यास आम्ही सक्षम असून कुठल्याही प्रकारे उत्तर देण्यास तयार आहोत असा दावाही त्यांनी केला आहे. पण यावर अद्यापपर्यंत हिंदुस्थानच्या नौदलाने उत्तर दिलेले नाही.

Leave a comment

0.0/5