पाकिस्तानच्या ताब्यात सापडलेले हिंदुस्थानच्या हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान हे शनिवारी हिंदुस्थानात परतले. त्यांनी पाकिस्तानच्या ताब्यात असतानाही दाखवलेल्या शौर्याची संपूर्ण देशभरात चर्चा झाली. आता लवकरच त्यांचे शौर्य शाळांमधील पुस्तकात वाचायला मिळणार आहे. राजस्थानमधील शाळांमधील अभ्यासक्रमात अभिनंदन यांच्यावरील धडा समाविष्ट करण्यात येणार आहे.
राजस्थानचे शिक्षण मंत्री गोविंद सिंग दोतास्रा यांनी अभिनंदन यांच्यावरील धडा शाळामधील पुस्तकात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आज ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. याआधी गोविंद सिंग यांनी पुलवामा हल्ल्यावरील धडा अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा प्रस्ताव अभ्यासक्रम तयार करणाऱ्या समितीकडे दिला होता. हा प्रस्ताव देखील समितीने मान्य केला होता.