Skip to content Skip to footer

‘नागरिक प्रतिसादा’त नवी मुंबई देशातील सर्वोत्तम शहर

स्वच्छ अभियानातील नवी मुंबईकरांच्या सहभागावर केंद्राने बुधवारी अखेर शिक्कामोर्तब केले. ‘नागरिक प्रतिसाद’ विभागात देशातील सर्वोत्तम शहर या पुरस्काराने नवी मुंबईला सन्मानित करण्यात आले.

तसेच स्वच्छतेत सातव्या स्थानी तर अमृत शहरांमध्ये प्रथम दहामध्ये राज्यातील एकमेव शहर नवी मुंबईचा क्रमांक लागला आहे! लोकसहभागाअभावी दरवर्षी पिछाडीवर पडणाऱ्या नवी मुंबईला स्वच्छ भारत अभियानात पुढे नेण्यासाठी प्रशासनाने साधलेला लोकसंवाद लागू पडला आहे.

मागील वर्षीचे देशातील स्वच्छतेमधील मानांकन दोनने उंचावत सातव्या क्रमांकावर नवी मुंबईने झेप घेतली. तर महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणूनही नवी मुंबईला गौरविण्यात आले. नवी दिल्लीत झाला सोहळा : 
नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे बुधवारी (ता. 6) झालेल्या विशेष सोहळ्यात केंद्रीय गृहनिर्माण व शहर विकास मंत्रालयाचे केंद्रीय सचिव दुर्गाशंकर मिश्रा, स्वच्छ भारत मिशनचे संचालक व्ही. के. जिंदाल, इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., स्वच्छ नवी मुंबई मिशन समितीच्या सभापती नेत्रा शिर्के यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

नवी मुंबई ‘थ्री स्टार’चे मानकरी : 
नवी मुंबई शहर ‘थ्री स्टार रेटिंग’चे मानकरी ठरले आहे. यावर्षी केंद्रीय निरीक्षक पथकाने स्टार रेटिंगच्या निकषानुसार कागदपत्रे व प्रत्यक्ष तपासणी केली. त्याचप्रमाणे हागणदारीमुक्त शहरामध्येही नवी मुंबई महानगरपालिकेस ‘ओडीएफ’ डबल प्लस रेटिंग प्राप्त झाले आहे.

स्वच्छता अ‍ॅपवरही नागरिक प्रतिसादाची नोंद :
केंद्रीय स्वच्छता निरीक्षक समितीद्वारे नागरिकांशी साधलेल्या संवादातून त्यांच्याकडून स्वच्छतेविषयी अभिप्राय घेण्यात आले होते. त्याचप्रमाणे स्वच्छता अ‍ॅपवरही नागरिक प्रतिसादाची नोंद घेण्यात येत होती. याशिवाय स्वच्छ भारत मिशनच्या केंद्रातून कोणत्याही नागरिकास दूरध्वनी करून शहरातील स्वच्छतेविषयी त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या होत्या. 1969 या टोल फ्री क्रमांकावरून तसेच वेब पोर्टलवरूनही स्वच्छताविषयक प्रश्नावली तयार करण्यात आली होती. ज्यातून नवी मुंबईतील नागरिकांचे अभिप्राय जाणून घेण्यात आले.

Leave a comment

0.0/5