Skip to content Skip to footer

संगम माहुलीतील वखारीस आग

सातारा / प्रतिनिधी : येथील संगम माहुली परिसरातील रहिवासी लक्ष्मण हरिभाऊ भोसले यांच्या मालकीच्या लाकडांना आग लागल्याने सुमारे 15 टन लाकडे आगीत भस्मसात झाली आहेत. ही आग मोठ्या प्रमाणात भडकल्याने भोसले यांच्यासह लगतच्या राहिवाश्यांचीही वित्तहानी झाली. श्री. भोसले यांच्या शेजारी राहणार्‍या बाळकृष्ण शिंदे व महेंद्र शिंदे यांच्या घरांनाही या आगीची झळ बसली असून एकाच्या भिंतीस तडा गेला आहे.

जळालेली घरगुती लाकडाची गंज नसुन लक्ष्मण भोसले यांची अनधिकृत लाकडाची वखार होती आणि त्या वखारीला काही स्थानिकांनी विरोधही केला होता. तसेच ही वखार बंद करण्याच्या सूचनाही प्रशासनाकडून वारंवार देण्यात आल्या होत्या. परंतू श्री. भोसले यांनी कोणासही न जुमानता वन विभागाच्या कोणत्याही परवानगीशिवाय झाडे तोडली होती. वन विभागाने वेळीच कारवाई केली असती तर अनर्थ टळला असता असे परिसरातील राहिवाश्यांनी दैनिक लोकमंथनशी बोलताना सांगितले. दरम्यान ही आग आटोक्यात आणण्यासाठी सातारा नगरपरिषद, कूपर कार्पोरेशन आणि अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना यांच्या आग्निशमन दलाची मदत झाली.

Leave a comment

0.0/5