Skip to content Skip to footer

गौतम गंभीर राजकारणाच्या मैदानात? पदार्पणातच तिकीट मिळण्याची शक्यता

पूर्वी स्फोटक फलंदाजीसाठी आणि आता तिखट ट्विटसाठी प्रसिद्ध असलेला माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर हा आता राजकारणाच्या मैदानात उतरणार असल्याचं बोललं जात आहे. गंभीरला आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजप तिकीट देण्याची शक्यता असून त्याचा लवकरच भाजपमध्ये प्रवेश होईल अशी शक्यता आहे. 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने दिल्लीतील सातही जागा जिंकल्या होत्या. सध्या दिल्लीमध्ये भाजपविरोधात नाराजी असून या नाराजीचा फटका बसू नये यासाठी बहुतांश उमेदवार बदलण्याबाबात भाजप गांभीर्याने विचार करीत आहे.

दिल्लीतून भाजप एका केंद्रीय मंत्र्याला, विरोधी पक्षातून भाजपमध्ये आलेल्या एका माजी खासदाराला आणि दिल्लीतील आमदाराला खासदारकीचे तिकीट देईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. एका हिंदी वर्तमानपत्राने प्रसिद्ध केलेल्या बातमीमध्ये म्हटलंय की मीनाक्षी लेखी यांच्या जागी भाजप गौतम गंभीर याला तिकीट देण्याबाबत विचार करत आहे. हे वृत्त त्यांनी भाजपच्याच एका नेत्याच्या हवाल्याने छापलं आहे. या भाजप नेत्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर ही बातमी दिल्याचंही म्हटलं आहे. गौतम गंभीर हा सातत्याने विरोधी पक्ष आणि खासकरून आम आदमी पार्टीवर ट्विटरच्या माध्यमातून सडकून टीका करतो. यामुळे त्याचा भाजपकडे ओढा असल्याचा पूर्वीपासून कयास बांधला जात होता. यामुळेच तो राजकारणात उतरणार असल्याची चर्चा देखील आधीपासून सुरू झाली आहे. त्याला पक्षात घेतल्यास सुमार कामगिरी करणाऱ्या मीनाक्षी लेखी यांच्या जागी गंभीरला संधी मिळू शकते.

दिल्लीतील काही नगरसेवकांनी पक्षनेतृत्वाला विनंती केली होती की चेहरे बदलल्यास नाराजीचा फटका भाजपला बसणार नाही. 2017 साली झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये भाजपने हा प्रयोग करून बघितला होता, ज्याला चांगलं यश मिळालं होतं. भाजपने जर बदल करण्याचं ठरवलं तर सध्याचे चांदणी चौकचे खासदार डॉ.हर्ष वर्धन यांना दिल्ली उत्तर मधून उमेदवारी दिली जाऊ शकते. चांदणी चौक मतदार संघातून विजय गोयल किंवा भाजप आमदार विजेंद्र गुप्ता यांना उमेदवारी मिळू शकते. ईशान्य दिल्लीतून उमेदवार बदलायचं ठरवल्यास माजी आमदार मोहन सिंह किंवा रामवीर सिंह बिधुरी यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. या मतदारसंघातून दिल्ली भाजपचे सरचिटणीस कुलजीत चहल यांचेही नाव चर्चेत आहेत. दिल्लीतील सातही मदरासंघासाठी किमान 3 चांगल्या उमेदवांरांची नावे निवडण्यात आली आहेत. यातून अंतिम उमेदवार पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून निवडला जाणार आहे.

Leave a comment

0.0/5