Skip to content Skip to footer

IND vs ENG: टीम इंडियासाठी वनडे महत्त्वपूर्ण नाही! ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’ आणि ‘टी-२० वर्ल्ड कप’वर भारताची नजर

महाराष्ट्र बुलेटिन : टी-२० मालिकेदरम्यान हार्दिक पांड्याकडून गोलंदाजी करण्यात आली होती. त्याने चांगली गोलंदाजीही केली, पण तरीही वन डे मालिकेत (भारत विरुद्ध इंग्लंड) त्याच्याकडून गोलंदाजी करण्यात आलेली नाही. पहिल्या दोन्ही एकदिवसीय सामन्यांमध्ये फिरकी गोलंदाज महागात पडले. तरीही हार्दिकने एकही ओव्हर टाकली नाही. कर्णधार विराट कोहली कडूनही याबाबत मोठे विधान समोर आले आहे. याकडे टीम इंडियाची रणनीती म्हणून पाहिले जाऊ शकते, कारण यावर्षी दोन मोठे टूर्नामेंट्स होणार आहेत.

दुसरा एकदिवसीय सामना गमावल्यानंतर विराट कोहलीने म्हटले की, ‘आपल्याला हार्दिकची योग्य प्रकारे देखरेख करणे आवश्यक आहे. त्याची गरज कुठे आहे हे जाणून घेणे महत्वाचे आहे. टी-२० मध्ये हार्दिकने गोलंदाजी केली होती, पण वनडेमध्ये त्याचा वर्कलोड पाहणे महत्त्वाचे असून आपल्याला इंग्लंडमध्ये कसोटी सामने खेळायचे आहेत आणि त्यामुळे हार्दिकचे तंदुरुस्त असणे आपल्यासाठी महत्वाचे आहे.’ एकदिवसीय मालिकेतील अंतिम सामना २८ मार्च रोजी खेळला जाणार आहे. मालिका अजूनही १-१ अशी आहे. यापूर्वी टीम इंडियाने कसोटी मालिका ३-१ ने आणि टी-२० मालिका ३-२ ने जिंकली आहे.

जूनमध्ये होणार न्यूझीलंडसोबत अंतिम लढत

यावर्षी टीम इंडियाला जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडशी भिडायचे आहे. याशिवाय टी-२० वर्ल्ड कपही यावर्षीच होणार आहे. म्हणजेच यावर्षी आयसीसीचे दोन मोठे इव्हेंट होणार आहेत. इंग्लंडच्या साऊथॅम्प्टन मैदानावर १८ ते २२ जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रंगणार आहे. इथली खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अनुकूल मानली जाते. अशा परिस्थितीत हार्दिक पांड्या हा महत्वाचा सामना खेळू शकतो. तथापि, हार्दिकने सप्टेंबर २०१८ पासून कसोटी मालिका खेळलेली नाही. त्याच्या कसोटी विक्रमाबद्दल बघितले तर त्याने ११ कसोटींमध्ये ३१ च्या सरासरीने ५३२ धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे. गोलंदाजी करताना पांड्याने १७ बळी घेतले आहेत.

विराट कोहली आयसीसी ट्रॉफी जिंकू शकलेला नाही

यावर्षी टी-२० विश्वचषक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणार आहे. घरच्या मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेत टीम इंडियाला चांगली कामगिरी करायची आहे. टी-२० मध्ये हार्दिक पांड्याचे रेकॉर्ड खूप शानदार आहे. अशा परिस्थितीत तो संघातील सर्वात महत्त्वाचा खेळाडू असल्याचे सिद्ध होऊ शकते. दुसरीकडे कर्णधार विराट कोहलीची नजर आयसीसीच्या दोन्ही स्पर्धांवर असेल. कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने अद्याप आयसीसीचे जेतेपद पटकावले नाही. अशा परिस्थितीत कोहली यावर्षी हे जेतेपद पटकावण्यासाठी ताकद पणाला लावेल. २००७ मध्ये टीम इंडियाने अखेरचा टी-२० वर्ल्ड कप जिंकला होता.

Leave a comment

0.0/5