Skip to content Skip to footer

झारखंड : भीषण अपघातात एकाच कुटुंबातील १० जणांचा दुर्दैवी मृत्यू

टीम महाराष्ट्र देशा : इनोव्हा कार आणि ट्रक यांच्यामध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये १० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. झारखंडची राजधानी रांची जवळील राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे चारच्या दरम्यान हा भीषण अपघात झाला असून रांची येथे राहणाऱ्या एकाच कुटुंबातील १० व्यक्तींचा यामध्ये मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रांची येथे राहणारे सिंह कुटुंबीय घरातील लहानग्याचे मुंडन करून बिहारहून इनोव्हा कारने रांचीला आपल्या घरी निघाले होते. कारमध्ये एकाच कुटुंबातील ड्रायव्हरसह एकूण दहाजण होते. दरम्यान, समोरून येणाऱ्या ट्रकला कारची जोरदार धडक बसली आणि कारमधील संपूर्ण कुटुंबाचा जागीच मृत्यू झाला. ही धडक एवढी जबरदस्त होती की, यामध्ये कारचे पूर्णपणे तुकडे तुकडे झाले आहेत. मृतांमध्ये ४ पुरुष, ३ महीला आणि ३ लहान मुलांचा समावेश होता.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली. मृतांचे शव शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहेत. या घटनेने सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a comment

0.0/5