Skip to content Skip to footer

स्मरण शंभूराजांचे – वयाच्या ३२ व्या वर्षी धर्मासाठी बलिदान देणाऱ्या धर्मवीराचे !

टीम महाराष्ट्र देशा : कशाप्रकारे क्रूरतेची सीमा पार करून छळ छळ करून संभाजी महाराजांना जीवे मारण्यात आले हे आजही आठवले तरी, कोणाचाही डोळ्यात टचकन पाणी आल्याशिवाय राहणार नाही. इतिहासाच्या पानावर शुरतेचे प्रतिक म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ते म्हणजे ‘छत्रपती संभाजी महाराज’. आज ११ मार्च ,संभाजी महाराजांची पुण्यतिथी. हा दिवस बलिदान दिन म्हणून देखील ओळखला जातो.

कोण होते संभाजी महाराज ?

‘छत्रपती शिवाजी महाराज’ आणि त्यांच्या पहिल्या ‘पत्नी सईबाई’ यांचे मोठे चिरंजीव म्हणजे संभाजीराजे. त्यांना शंभूराजे म्हणून देखील ओळखले जाते. मराठा साम्राज्याचे ते दुसरे छत्रपती होते. आपल्या कर्तुत्वावर आणि ज्ञानावर वयाच्या २३ व्या वर्षी ते छत्रपती बनले.

शंभूराजांचे बालपण

संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर येथे झाला. जेव्हा शंभूराजे केवळ २ वर्षांचे होते तेव्हाच त्यांची आई सईबाई यांचे निधन झाले. आणि तेव्हाच त्यांच्या संघर्षाला सुरुवात झाली. सईबाईनंतर त्यांचा सांभाळ जिजामाता यांनी केला, त्यांच्यावर संस्कार घडवले. त्यामुळे एक शूर योद्धा होण्याचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले. शिवाजी महाराजांनी शंभूराजांना ‘आग्रा भेटीच्या’ वेळी सोबत नेले तेव्हा ते केवळ 9 वर्षांचे होते युद्ध, राजकारण, राजकारणातील डावपेज, रयतेवरील प्रेम आणि शुरतेचे धडे त्यांना लहान वयामध्येच मिळाले. याचबरोबर शंभू राजांना वयाच्या १४ व्या वर्षी वाचनाची आणि लिखाणाची आवड निर्माण झाली. त्यांनी त्या काळात संस्कृत भाषेचे ज्ञान घेतले आणि वयाच्या १५ व्या वर्षी ‘बुधभूषण’ हा संस्कृत ग्रंथ लिहला. आणि ते संस्कृत पंडित झाले.

औरंगजेबाने क्रूरतेने केला होता शंभूराजांचा अंत

आजही छत्रपती संभाजी महाराज यांचा मृत्यू कशाप्रकारे झाला हे आठवले तरी कोणाचेही रक्त उसळल्याशिवाय आणि डोळ्यामध्ये टचकन पाणी आल्याशिवाय राहणार नाही. संभाजी महाराज आणि कवी कलाश हे शत्रूंच्या तावडीत सापडले त्या दिवसापासून तब्बल ४० दिवस ना ना प्रकारे औरंगजेबाने त्यांना मरणयातना दिल्या.

धर्मांतर केल्यास जीवदान देण्याचे मान्य केल्यानंतर संभाजीराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या औरंगजेबाने अत्यंत निर्दयीपणे हाल -हाल करून त्यांना जीवे मारण्याचे आदेश दिले. संभाजीराजे आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून अत्यंत मानहानीकारक अशी धिंड काढण्यात आली. संभाजीराजांना डोळे फोडणे, कानात शिसे ओतणे, जिभ कापणे या सारख्या क्रूर शिक्षा दिल्या. अखेर ११ मार्च ला औरंगजेबाने त्यांना ठार मारले आणि त्यांच्या देहाचे तुकडे तुकडे करून ते तुळापुर येथील नदीमध्ये फेकण्यात आले. धर्मांतर करण्याचा प्रस्ताव धुडकावून आपल्या देहाचे बलिदान करणारा एखादाच असतो आणि त्यासाठी सिंहाचे काळीज असावे लागते.

धर्मनिष्ठा आणि स्वराज्यनिष्ठा काय असते हे दाखवून देणारे धर्मवीर म्हणजेचं संभाजीराजे !

Leave a comment

0.0/5