Skip to content Skip to footer

घरचं झालं थोडं – कुमारस्वामींची व्यथा

घरचं झालं थोडं अन् व्याह्यानं धाडलं घोडं अशी आपल्याकडे म्हण आहे. कर्नाटकातील एच. डी. कुमारस्वामी यांच्या बाबतीत काहीसे वेगळेच घडले आहे. तिथे सहकारी पक्ष काँग्रेसच्या धमकावणी आणि कुरघोडींना कंटाळलेल्या कुमारस्वामींना घरातील कलागतीने त्रस्त केले आहे. येत्या लोकसभा निवडणुकीतच त्यांच्या घरातील ही भाऊबंदकी समोर येण्याची शक्यता आहे.

धर्मनिरपेक्ष जनता दलात (जेडीएस) सध्या जोरदार महाभारत सुरू आहे. जेडीएसचे प्रमुख आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या दोन नातवांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. पक्षाचे एक आमदार जी.टी. देवेगौडा यांनी केलेल्या एका ताज्या वक्तव्यामुळे या महाभारताला वाचा फुटली. ‘ते (देवेगौडा यांची मुले) वेगवेगळी राहतात. कुमारस्वामी आणि त्यांचे कुटुंब व एचडी रेवण्णा आणि त्याचे कुटुंब वेगळे आहेत. ते एक कुटुंब म्हणून काम करत नाहीत,’ असे जी. टी. देवेगौडा यांनी शनिवारी संध्याकाळी माध्यमांशी बोलताना सांगितले.

एच. डी. रेवण्णा यांच्या मुलाने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी आणि त्यांचे भाऊ रेवण्णा यांच्यातील अंतर वाढले आहे. स्वतः एच. डी. देवेगौडा यांच्या मतदारसंघाबद्दल अद्याप अनिश्चितता असल्यामुळे हे अंतर आणखी वाढल्याचे जेडीएसच्या नेत्यांचे म्हणणे आहे.

रेवण्णा यांचे चिरंजीव प्रज्वल यांनी आठ वर्षांपूर्वी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी ते नुकतेच महाविद्यालयीय शिक्षण संपवून बाहेर पडले होते. आपले आजोबा एच. डी. देवेगौडा यांच्यावर त्यांची भिस्त होती. मात्र थेट निवडणुकीच्या मैदानात उतरण्यापूर्वी त्यांना आपला मतदारवर्ग निर्माण करावा लागेल आणि पक्षकार्य करावे लागेल, असे त्यांना सांगण्यात आले.

तेव्हा प्रज्वल यांनी हसन जिल्ह्यातील होळनरसिपुरा या मतदारसंघाला आपले केंद्र बनविले आणि पक्षाचे कार्य करण्यास सुरुवात केली. पक्षाच्या सक्रिय कार्यकर्त्यांची युवक शाखा त्यांनी तयार केली. त्यामुळे योग्य वेळ येताच आपल्याला उमेदवारी देण्यात येईल, याबद्दल त्यांना भरवसा होता. मात्र 2018 विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी न देता पक्षाचे सरचिटणीस करण्यात आले. अखेर 2019 च्या लोकसभ निवडणुकीत आपला हसन मतदारसंघ प्रज्वल यांच्यासाठी रिकामा करू, असे देवेगौडा यांनी जाहीर केले. त्यावेळी असे ठरविण्यात आले होते, की देवेगौडा हे हसनऐवजी मंड्या येथून निवडणूक लढवतील आणि हसनची जागा प्रज्वल यांना मिळेल. या संबंधात देवेगौडा यांनी यावर्षी जानेवारीत औपचारिक घोषणा केली होती.

या घोषणेला काही आठवडे उलटल्यांतर कुमारस्वामींचे चिरंजीव निखिल गौडा यांचा एक चित्रपट ‘सीताराम कल्याण’ आला. यातून शेतकऱ्यांचा रक्षणकर्ता म्हणून निखिल यांची प्रतिमा पुढे आणण्यात आली. मंड्या येथील लोकांना हा चित्रपट पाहण्यासाठी मोफत तिकिटे वाटण्यात आली. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये निखिल गौडा यांनी मंड्यातील पक्ष कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला आणि लोकसभा निवडणुका लढविण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मोठा दबाव असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले होते.

बुधवारी, 6 मार्च, रोजी निखिल गौडा यांनी मंड्या मतदारसंघातून काँग्रेस-जेडीएस युतीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे औपचारिकपणे जाहीर केले. एच. डी. रेवण्णा आणि प्रज्वल यांना हे अजिबात खपले नाही कारण प्रज्वल यांना उमेदवारी मिळण्यासाठी आठ वर्षे काम करावे लागले होते आणि दुसरीकडे, राजकारणात कोणताही अनुभव नसलेल्या निखिल यांना थेट तिकिट देण्यात येणार होते.

आता निखिल यांच्यासाठी मंड्याची जागा सोडाव्या लागलेल्या देवेगौडा यांना आता म्हैसूर-कोडगू किंवा उत्तर बंगळुरू निवडणूक लढवावी लागणार आहे. अर्थात यातील म्हैसूरची जागा काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची असल्यामुळे ते ही जागा सोडण्यास नाखुश आहेत. याचमुळे पक्षाच्या काही नेत्यांनी देवेगौडा यांना हसनमधून निवडणूक लढवण्याचा आग्रह केला आहे. यामुळे रेवण्णा आणखी भडकले.

म्हणूनच ऊर्जामंत्री असलेल्या रेवण्णा यांनी नुकतच दिवंगत झालेले प्रसिद्ध कन्नड अभिनेते आणि माजी मंत्री अंबरीश यांची पत्नी सुमलता यांच्या विरोधात असभ्य शेरेबाजी केली. मंड्या भागात अंबरीश यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे त्यांनी जाणूनबुजून सुमलता यांच्यावर टीका करून काँग्रेस समर्थकांना दुखावले. अशा परिस्थितीत नवख्या निखिल गौडांना तिकिट दिल्यास त्यांचा टिकाव लागणार नाही, असे त्यांचे यामागचे गणित आहे.
आता तर खरी सुरूवात आहे. निवडणुकीला प्रत्यक्ष सुरूवात होईल तेव्हा हा संघर्ष आणखी रंगतदार होत जाणार आहे.

Leave a comment

0.0/5