Skip to content Skip to footer

पब मध्ये नाचणारा अचानक रथ यात्रेत नाचू लागला – विजय शिवतारे

पबमध्ये नाचणारा अचानक रथयात्रेत नाचू लागतो, बघा काय जादू आहे या पक्षाची, अशा शब्दात राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ लोकसभा उमेदवार पार्थ पवारांची खिल्ली उडवली. युतीचे मावळ लोकसभा उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराचा नारळ फोडताना शिवतारे यांनी पार्थ पवारांवर तोफ डागली. शिवतारे यावेळी म्हणाले की, विदेशी गाड्यांमध्ये फिरणारा रेल्वेत बसू लागतो, शेतकऱ्यांच्या शेतात जायला लागतो. बिघडलेल्या पोराला सुधारवण्याचं काम यानिमित्ताने होत आहे. पार्थ निवडून तर येणार नाही पण अजित पवारांची चिंता कमी झाली तरी ही निवडणूक सार्थकी लागेल, असेही शिवतारे यावेळी म्हणाले.

मावळ मतदार संघातून नाही हो नाही हो करत शेवटी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या नातवाचे म्हणजे पार्थ पवार यांचे नाव जाहीर केले होते. परंतु तिथे पार्थ यांना शिवसेना खासदार संसदरत्न श्रीरंग बारणे यांचा परावभाव करणे तसे कठीणच आहे. पुढे शिवतारे म्हणाले आजोबा म्हणतात नातवाला निवडून द्या, अन नातू म्हणतो आजोबांना पंतप्रधान करायचंय. निव्वळ स्वार्थच राजकारण करणाऱ्या अशा विघातक लोकांना लोकशाहीतून हद्दपार करायला हवं, त्याची संधी या लोकसभेच्या निमित्ताने आल्याचे मंत्री शिवतारे म्हणाले. बारामतीचा जनरल डायर आज मुलाला मतं द्या म्हणतोय, मावळमधून राष्ट्रवादी काँग्रेसला एक मत ही देऊ नका. मावळ गोळीबारातील शहीदांना हीच खरी श्रद्धांजली असेल असंही शिवतारे म्हणाले.

मावळ मधील घडलेल्या प्रकारची आठवण सुद्धा मंत्री शिवतारे यांनी मावळ मधील जनतेला करून दिलेली आहे. पार्थ पवारांना निवडणुकीत उतरवलंय म्हणजे भरपूर लक्ष्मी दर्शन होणार आहे, असं वक्तव्य शिवसेना उपनेत्या नीलम गोऱ्हेंनी यावेळी केले. नुकतंच बारामतीत गेले होते, तेव्हा संतापी इच्छुकाला उमेदवारी मिळाली नाही तर ते टीव्ही फोडून टाकतात, असे एकाने सांगितलं. मग आता आपला विजय घोषित होईल, तेव्हा आपले टीव्ही सुरक्षित ठेवावे लागतील, अशी खोचक टीका त्यांनी पार्थ पवारांचं नाव न घेता टीका केली.

Leave a comment

0.0/5