राहुल गांधी पंतप्रधान म्हणून चालतील का? हे आधी शरद पवार यांना विचारून घ्या, नाहीतर तुमच्या पुढील स्क्रिप्ट बंद होतील,’ असा टोला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मारला आहे. मनसेच्या पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर केलेल्या टीकेला विनोद तावडे यांनी यावेळी उत्तर दिले. ‘हा सव्वाशे कोटी लोकसंख्येचा देश आहे. हा काही खेळ नाही. खड्ड्यात जायला तो काय मनसे पक्ष आहे का’, असा सवाल विनोद तावडे यांनी केला. तसेच, ‘राहुल गांधी पंतप्रधान म्हणून चालतील का? हे आधी शरद पवार यांना विचारून घ्या, नाहीतर तुमच्या पुढील स्क्रिप्ट बंद होतील,’ असा टोला लगावला.
आज स्वतःचे इंजिन बंद पडले आणि हे दुसऱ्यांना मदत करत आहेत अशी टीका विनोद तावडेंनी केली आहे. शिवाय, जे निरुपम राज ठाकरे यांना लुख्खा म्हणाले होते, तेच आता मनसैनिकाना सांगणार निरुपम यांना मतदान करा. हा तर मनसैनिकांवर होणारा अन्याय असल्याचे विनोद तावडे यावेळी म्हणाले. ‘बाळासाहेबांचा आदर्श घेऊन चालणाऱ्याने हा नको म्हणून त्याला निवडून द्या हे सांगण बरोबर नाही. एवढाच अभ्यास पक्षासाठी केला असता तर फायदा झाला असता. आधी कष्ट घेतले असते तर दुसऱ्याला मदत करायची वेळ आली नसती’, असा टोलाही विनोद तावडे यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.
गुढी पाडव्याला शिवाजी पार्क येथे झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपाध्य अमित शहा यांच्या विरोधात भूमिका मांडलेली होते. ते म्हणाले, नेहरू हे देशाचे पंतप्रधान हे महात्मा गांधींनी ठरवले, त्यावेळेला पर्याय ठेवला नव्हता, त्यानंतर जितके देशाचे पंतप्रधान झाले, तेव्हा लोकांना पर्याय होता का? मग आताच ही पर्यायाची चर्चा का? नरेंद्र मोदींनी जितका देश खड्ड्यात घातलाय, ह्या पेक्षा अजून खड्ड्यात घालणारा कोण येणार आहे?, नरेंद्र मोदींना संधी दिली, त्यांनी देश खड्ड्यात घातला, आता राहुल गांधींना संधी देऊन बघू या, खड्ड्यात घालतील किंवा देशाचे चांगले देखील करून दाखवतील असे राज ठाकरे यांनी बोलून दाखविले.