Skip to content Skip to footer

मावळ मतदार संघात पार्थ पवार यांच्या अडचणीत वाढ

मावळ मतदार संघातून शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या समोर राष्ट्रवादींने अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ अजित पवार यांना उमेदवारी दिलेली आहे. परंतु मागील काही दिवसापासून पार्थ पवार आपल्या वागण्या वरून महाराष्ट्रात आणि आपल्या मतदार संघात चर्चेचा विषय बनत चालले होते. त्यातच शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणेंच्या उमेदवारीला युतीतील घटपक्ष असणाऱ्या भाजपचे पिंपरी-चिंचवडमधील आमदार लक्ष्मण जगताप यांनी विरोध दर्शवला होता. मात्र आता अखेर या दोन नेत्यांमध्ये दिलजमाई झाली आहे. या दोन नेत्यांच्या एकत्रित येण्यामुळे राष्ट्रवादी आणि मावळचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्यासमोरील आव्हान आणखी कठीण बनले आहे.

मावळमध्ये शिवसेनेचे नेते श्रीरंग बारणे आणि आमदार जगताप यांच्यामधून विस्तवसुद्धा जात नव्हता असे चित्र होते. मावळमधून महायुतीचा उमेदवार विजयी करायचा असा चंग बांधलेल्या मुख्यमंत्र्यांनी अखेर या दोन्ही महारथी नेत्यांमध्ये समेट घडवून आणला. त्यामुळे मावळमध्ये भाजप आणि शिवसेना एकदिलाने लोकसभा लढण्यास सज्ज झाल्याने बारणे यांचा विजय पक्का मानला जाऊ लागला आहे. दरम्यान, अजित पवार यांनी सुपुत्र पार्थसाठी सर्वदूर प्रचार करण्यासाठी कंबर कसली आहे. पार्थची आई सुनेत्रा पवार, वडील अजित पवार, भाऊ जय पवार आणि चुलत भाऊ रोहित पवार आणि अजित पवार यांची बहीण हे सर्व पिंपरी-चिंचवड मध्ये बैठका घेत असून पार्थचा प्रचार करत आहेत. यावरून पवार कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागलेली दिसत आहे. आता हि मेहनत किती कामात येते हे निवडणूक झाल्यानंतरचं समजेल असे सुद्धा बोलून दाखविले जात आहे.

Leave a comment

0.0/5