Skip to content Skip to footer

‘लाव रे तो व्हिडिओ’चे बुमरँग राज ठाकरेंवरच; विरोधक म्हणतात ‘साड्या चोरल्याचे व्हिडिओही दाखवा’

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपाविरुद्ध प्रचाराला सुरुवात केली आहे. राज यांनी मागील आठवड्याभरापासून महाराष्ट्रातील तीन ठिकाणी जाहीर सभा घेतल्या आहेत. १२ एप्रिल रोजी नांदेडमध्ये, १५ एप्रिल रोजी सोलापूर तर मंगळवारी इचलकरंजी येथे राज ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारासाठी सभा घेतल्या. राज ठाकरे या सभांमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून भाजपाच्या नेत्यांची पूर्वीची आणि आत्ताची वक्तव्ये दाखवून पुराव्यासहीत टीका करत असल्याचे दिसत आहेत. नांदेड येथील पहिल्याच सभेत त्यांनी पंतप्रधान मोदींची काही वर्षांपूर्वीची आणि आत्ताच्या विधानांचे व्हिडिओ दाखवून त्यांनी दिलेली आश्वासने किती फसवी आहेत यासंदर्भात भाषण केले आहे.

नांदेडनंतरच्या दोन्ही सभांमध्येही त्यांनी व्हिडिओचा वापर करुन सरकारवर घणाघाती टिकास्त्र सोडले. याच व्हिडिओचा धसकाच आता विरोधकांनी घेतल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. सभांमध्ये हे व्हिडिओ मोठ्या पडद्यावर दाखवायला सांगताना राज ठाकरे कार्यकर्त्यांना ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणताना दिसतात. नेटकऱ्यांनी आता याच ‘लाव रे तो व्हिडिओ’बद्दल सोशल नेटवर्किंगवर अनेक पोस्ट केल्या आहेत. लाव रे तो विडिओ ‘साड्या चोरल्याचे’, “लाव रे तो गुजरातच्या सहलीचा व्हिडिओ’, ‘तो रईस आणि ये दिल मुश्किल वेळी केलेल्या मांडवलीचा व्हिडिओ लाव रे’ , ‘तो बंद पडलेल्या बांधकामाचा व्हिडिओ लाव रे’ असे मॅसेज सध्या ट्विटववर फिरताना दिसत आहे. त्यामुळे ट्विटवरच्या माध्यमातून राज ठाकरे आणि त्यांच्या भाषणाची खिल्ली उडवताना नेटकरी दिसत आहे.

Leave a comment

0.0/5