Skip to content Skip to footer

पवारांनी सत्तेत असताना दुष्काळावर कोणत्या योजना राबविल्या ते सांगावे-उद्धव ठाकरे

राज्यातील बरीच धरणं तळाला गेली असल्याने भीषण पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. चारा व पाण्याच्या टंचाईने नागरिक त्रस्त झाले आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राज्य सरकारला लक्ष्य करताना दिसून येत आहे. याच मुद्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या ‘सामना’तील अग्रलेखात शरद पवारांचे कान टोचले आहे. महाराष्ट्रावर कोसळलेले दुष्काळाचे संकट गंभीरच आहे.

मात्र त्यावरून राजकीय पोळ्या भाजणे योग्य नाही. उलट दुष्काळाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन दोन हात केले पाहिजेत. सरकार तर काम करते आहेच; पण विरोधी पक्ष, दानशूर लोक आणि स्वयंसेवी संस्था या सगळ्यांनीच सरकारच्या खांद्याला खांदा लावून दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसले पाहिजेत. प्रसंग बाका आहे. त्यामुळे टीका करण्यापेक्षा दुष्काळग्रस्त भागात आपण काय काम करू शकतो याचा विचार प्रत्येकानेच करायला हवा, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिला आहे. महाराष्ट्रातील या वेळचा दुष्काळ भीषण आहे. निवडणुकांचा सुकाळ संपला आहे. त्यामुळे आता दुष्काळ निवारणाच्या कामात झोकून देणे गरजेचे आहे.

दुष्काळी भागातील जनतेला पिण्याचे पाणी आणि रोजगार तातडीने द्यावा, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज तातडीने माफ करावे, पीक कर्जासह अन्य कर्जांची वसुली तत्काळ थांबवावी, यंदाच्या दुष्काळात फळबागांचे नुकसान मोठे आहे, त्यांना मदत करावी. आमच्या माहितीनुसार दुष्काळ निवारणासाठी सरकारने या व इतर अनेक उपाययोजना केल्या आहेत.

दुष्काळग्रस्त गावांमध्ये जमीन महसूल करात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेती पंपाच्या वीज बिलात ३३.५ टक्के सूट, विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी अशा अनेक बाबी सरकारने आधीच केल्या आहेत. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार दुष्काळग्रस्त जिल्ह्यांचे पालकमंत्री आपापल्या अधिपत्याखालील जिल्ह्याच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या गावांना भेटी देऊन तेथील चारा-पाण्याच्या टंचाईची माहिती घेऊन तातडीने उपाययोजना करण्याविषयी अधिकाऱ्यांना सूचना देण्याचे काम पालकमंत्री करीत आहेत, असा दावाही उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

Leave a comment

0.0/5