Skip to content Skip to footer

जेट कामगारांची रोजी रोटी टिकली पाहिजे शिवसेनेचा केंद्राकडे पाठपुरावा..

रोजीरोटी टिकलीच पाहिजे’ अशा जोरदार निदर्शनांनी जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांनी आज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा परिसर दणाणून सोडला. भारतीय कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. जेट एअरवेज बंद केल्याने २२ हजार कर्मचारी बेकार झाले आहेत. विमाने जागेवरच असल्याने देशाचा हजारो कोटी रुपयांचा महसूल बुडत आहे. याशिवाय विमान प्रवासही महागला आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधतानाच जेट एअरवेजच्या बचावासाठी शिवसेनेने सर्वच पातळीवर पाठपुरावा सुरू केला आहे.

भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने यावेळी जीव्हीकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना यावेळी एक निवेदन सादर करून जेट बंद झाल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे वास्तव त्यात मांडले आहे.जेटच्या विमानांची उड्डाणे थांबल्याने सर्व व्यवसाय आंतरराष्ट्रीय एअरलाइन्सकडे गेला आहे. परिणामी दर महिन्याला ८०० कोटी रुपयांचा महसूल बुडत आहे.

जेट बंद झाल्याने इतर एअरलाइन्सनी त्यांचे लक्ष मोठय़ा शहरांवरच केंद्रित केले आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. तिकिटांचे दरही चौपटीने वाढले आहेत. मुंबई-दुबई विमान प्रवास ८-१० हजार रुपये होता तो ५०-४५ हजारांवर पोहचला आहे. निर्यातीवर परिणाम जाणवू लागला आहे. या सर्व परिणामांची तातडीने दखल घेऊन जेटच्या बचावासाठी पावले उचला अशी मागणी यावेळी भारतीय कामगार सेनेने केली. शिष्टमंडळात चिटणीस संजय कदम, अजित साळवी आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. या निवेदनाची प्रत केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री, कामगार आयुक्त यांनाही पाठवण्यात आली आहे.

Leave a comment

0.0/5