Skip to content Skip to footer

EVM मुद्द्यावर आठवलेंचा पवारांना टोला…….

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईव्हीएमबाबत केलेल्या वक्तव्यावर रामदास आठवले यांनी मत व्यक्त केलं आहे. रामदास आठवले सध्या सोलापूरच्या दुष्काळ दौऱ्यावर आले आहेत. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवार यांना मिश्किल टोला लगावला.

शरद पवारांच्या ईव्हीएमबाबतच्या मताशी मी पण सहमत आहे, कारण काही ठिकाणी कमळाऐवजी (भाजपा) राष्ट्रवादीच्या घड्याळाला मतदान झालं आहे. ईव्हीएम मशीन या काँग्रेसच्या काळातील आहेत. त्यामुळे काही मशीन खराब असू शकतात. मात्र सर्वच मशीन खराब असू शकत नाहीत, असा मिश्कील टोला रामदास आठवले यांनी शरद पवारांना लगावला. घड्याळाचं बटण दाबल्यानंतरही कमळाला मत गेल्याचं मी डोळ्यानं पाहिलं आहे त्यामुळे मला ईव्हीएम मशीन बाबत चिंता वाटते, असं मत काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केलं होते.

फडणवीस सरकार अनुभवी नसल्याच्या शरद पवार यांच्या वक्यव्यावर बोलताना रामदास आठवले म्हणाले की, फडणवीस सरकार अनुभवी नसेल तर त्यांना आणखी पाच वर्षे द्यायला हवीत. शरद पवार हे अनुभवी आहेत, त्यांच्या सरकारने खूप कामे केली, मग तरीही महाराष्ट्र कोरडा कसा? असा सवाल रामदास आठवलेंनी विचारला. त्यामुळे दुष्काळाला कॉंग्रेस-राष्ट्रवादीच जबाबदार आहे, असा घणाघात ही आठवलेंनी केला.

Leave a comment

0.0/5