आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मनसेचे इंजिन जोडायचे का? यावर सध्या काँग्रेसच्या बड्या नेत्यानं मध्ये चर्चा रंगताना दिसत आहे. लोकसभेचे निकाल २३ मे रोजी जाहीर झाल्यानंतर निकालाचेे विश्लेषण करून मुंबई आणि महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची दिल्लीतील हायकमांड सोबत बैठक घेण्यात येईल. त्या बैठकीत प्रामुख्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या झंझावाती प्रचारामुळे किती मते मिळाली, याचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यानुसार आगामी विधानसभेला राज यांच्या मनसेसोबत आघाडी करावी का, याबाबत सध्या विचार होताना दिसत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्वाधिक चर्चा कोणाची झाली असेल, तर ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांची. लोकसभा निवडणूक न लढवता राज यांनी राज्यात अनेक ठिकाणी सभा घेतल्या. या सभांमधून त्यांनी मोदी आणि भाजप सरकारवर जोरदार टीका केली. त्यावर आता काँग्रेस नेते विचार करू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीला मनसेला सोबत घ्यावे, अशी भूमिका घेतली होती. परंतु तेव्हा काँग्रेसमधील नेते अशोक चव्हाण, संजय निरूपम यांच्यासह काही नेत्यांनी मनसेला सोबत घेण्यास विरोध दर्शविला होता. परंतु अप्रत्यक्षरित्या अशोक चव्हान, सुधीलकुमार शिंदे यांच्या मतदार संघात सभा घेऊन त्यांना फायदा पोहचेल अशीच भूमिका राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात मांडलेली होती.
विधानसभा निवडणुकीत महाआघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या वाट्याला आलेल्या काही जागा मनसेला देण्याची शक्यता आहे. मनसेच्या मते राज्यातील ३० मतदार संघात त्यांचा प्रभाव आहे. अशा परिस्थितीत विधानसभा निवडणुकीत शरद पवार आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसू शकतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला काँग्रेस-राष्ट्रवादी-मनसे अशी नवीन युती महाराष्ट्रातील जनतेला पाहायला मिळेल.