Skip to content Skip to footer

औरंगाबादमध्ये आंतरराष्ट्रीय विमानसेवेचा मार्ग होणार मोकळा

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ब्युरो आॅफ इमिग्रेशनच्या पथकाने पाहणी केली. पथकाने येथील मनुष्यबळासह सोयीसुविधांचा आढावा घेतला. आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी इमिग्रेशनची सुविधा महत्त्वपूर्ण ठरते. या पाहणीमुळे ही सुविधा लवकरच विमानतळावर सुरू होऊन आंतरराष्ट्रीय विमानसेवेचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

केंद्रीय उत्पादन शुल्क व सीमा शुल्क परिषदेने चिकलठाणा विमानतळाचा आपल्या मानांकन यादीत समावेश केला. त्यामुळे चिकलठाणा विमानतळ देशातील १९ वे आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरले. त्यामुळे चिकलठाणा विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरूहोण्यासाठी पहिले पाऊल पडले होते. आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी इमिग्रेशनची सुविधा महत्त्वपूर्ण आहे.  इमिग्रेशन विभागाद्वारे आंतरराष्ट्रीय प्रवाशांची पासपोर्ट आणि व्हिसा तपासणी केली जात असते.

विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे असले तरी येथे इमिग्रेशनची सुविधा नसल्याने त्यासाठी विमानतळ प्राधिकरणासह विविध माध्यमांतून पाठपुरावा केला जात होता. या सुविधेच्या दृष्टीने बुधवारी चिकलठाणा विमानतळावर ब्युरो आॅफ इमिग्रेशनच्या दोन सदस्यीय पथकाने पाहणी केली. यावेळी विमानतळावरील सुविधांचा आढावा घेतला. यावेळी विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांची उपस्थिती होती.

साळवे यांनी जानेवारीत  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर हवाई कनेक्टिव्हिटीची परिस्थिती मांडली. तेव्हा औरंगाबाद शहर बँकॉक आणि टोकियोशी जोडण्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली होती. त्यानंतर थायलंडच्या राजदूतांना औरंगाबादहून बँकॉकसह आशियाई देशांसाठी विमानसेवा सुरू करून आंतरराष्ट्रीय हवाई कनेक्टिव्हिटीसाठी प्रस्ताव देण्यात आला. अमेरिकेचे भारतातील राजदूत केनेथ जस्टर यांनाही प्राधिकरणातर्फे आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला. देशांतर्गत सेवेत वाढ होण्यास आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘ब्युरो आॅफ इमिग्रेशन’कडून पाहणी 
ब्युरो आॅफ इमिग्रेशनकडून पाहणी करण्यात आली आहे. पथकाने विमानतळावरील सोयीसुविधांची पाहणी केली. या पाहणीचा अहवाल सादर केला जाईल.  इमिग्रेशनसाठी गॅजेट नोटिफिकेशन काढावे लागते. इमिग्रेशन सुरू झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरूहोतील. – डी. जी. साळवे, संचालक, चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ

Leave a comment

0.0/5