आता महाराष्ट्रानंतर शिवसेना देणार बिहारमध्ये भाजपाला जोरदार टक्कर!
बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आता शिवसेना पक्ष सुद्धा उतरणार आहे, असे संकेत काही दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत यांनी दिले होते. मात्र या संदर्भात अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील असे त्यांनी बोलून दाखवले होते. आता खुद्द शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बिहार विधानसभा निवडणूक लढण्याचे आदेश दिलेले आहे. त्यामुळे बिहारमध्ये नितीश कुमार आणि भाजपचा गड हलवण्याची आता शिवसेनेनं जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
त्यात शिवसेना पक्षाने बिहार निवडणुकीसाठी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह सेनेचे डॅशिंग खासदार संजय राऊत, केंद्रात शिवसेनेची रोकठोक भूमिका मांडणाऱ्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्यासह इतर २० जणांच्या नावाचा समवेत या यादीतमध्ये करण्यात आला आहे.
होणाऱ्या या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे २५ वर्ष जुना मित्रपक्ष असलेल्या व आता महाराष्ट्रात कट्टर विरोधी भूमिका निभावणाऱ्या भाजपाची सरळ लढत शिवसेने बरोबर होणार आहे. त्यात राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बिहार निवडणुकीचे प्रभारी पद दिल्यामुळे या निवडणुकीला आणखी रंग चढणार आहे. त्यामुळे ही निवडणूक शिवसेना आणि फडणवीस अशीच बिहारमध्ये सुद्धा रंगताना दिसून येणार आहे.