Skip to content Skip to footer

सावरकरांच्या अवमानप्रकरणी ‘एबीपी माझा’ची बिनशर्त माफी…

“स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत एबीपी माझा या वृत्तवाहिनीने प्रक्षेपित केलेला कार्यक्रम म्हणजे थोर क्रांतिकारकाचा अवमान होता. त्यामुळे समस्त सावरकारांना मानणाऱ्या जनसमुदायची मने कुठेतरी दुखावलेली होती. त्या संदर्भात सावरकरांचे नातू रणजित सावरकर, खासदार राहुल शेवाळे, गोपाळ शेट्टी, आमदार अतुल भातखळकर आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने मंगळवारी एबीपी माझाच्या कार्यालयात जाऊन लेखी निवेदन सादर केले. तसेच लोकांच्या भावनांचा विचार सुद्धा करायला लावला होता.

या संदर्भात ‘एबीपी माझा’ वाहिनी तर्फे दिलगिरी व्यक्त करण्यात आलेली आहे. “आज स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता. अलीकडेच प्रसारित करण्यात आलेल्या ‘नायक की खलनायक’ या चर्चात्मक कार्यक्रमाप्रकरणी बिनशर्त माफी मागण्यात येत असून संबंधित कार्यक्रमाच्या चित्रफिती सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यात येतील” असे आश्वासन ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीतर्फे देण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीदिनी २८ मे रोजी ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीने ‘नायक की खलनायक’ या चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यानंतर या कार्यक्रमावर प्रचंड टीका झाली.

वृत्तवाहिनीने याप्रकरणी ताबडतोब माफी मागावी आणि संबंधित कार्यक्रम तत्काळ हटवावा, अन्यथा मोठ्या जनआक्रोशाला सामोरे जावे लागेल अशा शब्दांत शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी वृत्तवाहिनीला इशारा दिला होता. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष रणजीत सावरकर यांनी या वृत्तवाहिनीवर आर्थिक बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. याप्रकरणी रणजित सावरकर, खासदार राहुल शेवाळे, गोपाळ शेट्टी, आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मंगळवारी दुपारी ‘एबीपी माझा’च्या कार्यालयात जाऊन कार्यकारी निर्माता तुळशीदास भोईटे यांना निवेदन दिले होते.

Leave a comment

0.0/5