Skip to content Skip to footer

परभणी : वृक्षतोड वाढल्याने पर्यावरण धोक्यात

परभणी : जिल्ह्यात अल्पप्रमाणात असलेले वनक्षेत्र वाचविण्याच्या दृष्टीकोणातून प्रयत्न होणे आवश्यक असताना ही बाब प्रशासकीय अधिकाऱ्यांना गांभीर्याची वाटत नसल्याने जिल्ह्याचे पर्यावरण धोक्यात आले आहे़ परिणामी जिल्ह्याच्या तापमानात यावर्षांत उच्चांकी वाढ झाल्याचे दिसून येत आहे़परभणी जिल्ह्यात सद्यस्थितीत १०१़४८ चौरस किमी म्हणजेच जिल्ह्याच्या एकूण क्षेत्राच्या १़६२ टक्के वनक्षेत्र असल्याची २०१७ मध्ये शासन दरबारी नोंद आहे़ जिल्ह्यातील बहुतांश वनक्षेत्र हे जिंतूर तालुक्यातच आहे़ इतर तालुक्यांमध्ये मात्र हे वनक्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीकोणातून मागील काही वर्षामध्ये प्रयत्न झालेले नाहीत़

परिणामी झाडांची बेसुमार कत्तल होत असल्याचे सातत्याने पहावयास मिळत आहे़ परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते महात्मा फुले यांचा नियोजित पुतळा या दरम्यानची ३० ते ४० वर्षापूर्वीची झाडे शासनाच्या पर्यावरण विभागाची कोणतीही परवानगी न घेता महानगरपालिकेच्या काही कर्मचाऱ्यांनी रस्ता कामाच्या नावाखाली खाजगी व्यक्तींच्या माध्यमातून तोडली़ विशेष म्हणजे ही झाडे तोडण्याचे टेंडर काढण्यात आले नव्हते़ ही झाडे वाचविण्याच्या दृष्टीकोणातून पर्यावरण प्रेमींनी पुढाकारही घेतला होता; परंतु, प्रशासकीय पातळीवर उदासिनता दिसून आली़ शिवाय काहींनी त्यामध्ये खोडा घातला़

त्यामुळे या झाडांची कत्तल झाली़ अशीच काहीशी परिस्थिती परभणी-गंगाखेड रस्त्यावर पहावयास मिळाली़ या रस्ता कामाच्या नावाखाली जवळपास ८० ते ९० वर्षांपूर्वीची वडाची व इतर झाडे सर्रासपणे तोडण्यात आली़ एक झाड तोडल्यानंतर त्या बदल्यात किमान पाच झाडे लावून त्याचे संगोपन करावे, असा नियम असताना निगरगट्ट झालेल्या अधिकाºयांनी याकडे लक्षच दिले नाही़

परिणामी एकेकाळी रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी असलेल्या झाडांमुळे हिरवागर्द दिसणारा हा रस्ता आता मात्र ओसाड झाल्याचे दिसून येत आहे़ या रस्त्यावरील झाडे तोडतानाही पर्यावरण विभागाची परवानगी घेतली नाही़ तशी विचारण्याची तसदीही घेण्यात आली नाही़ परभणी-पाथरी व परभणी-जिंतूर रस्त्याच्या कामासाठीही अशीच काहीशी परिस्थिती पहावयास मिळाली़ जिल्हास्तरावर पर्यावरण समिती स्थापन करण्यात आलेली आहे़

झाडांची कमी होत असलेल्या संख्येमुळे जिल्ह्याच्या तापमानही मोठी वाढ झाली आहे़ २९ एप्रिल रोजी जिल्ह्याचे तापमान सर्वोच्च म्हणजे तब्बल ४७ अंश एवढे झाले होते़ आतापर्यंतचे परभणीच्या इतिहासातील हे उच्चांकी तापमान असल्याने आतातरी परभणीकरांना जाग येईल आणि पर्यावरण रक्षणासाठी परभणीकर सरसावतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे़

Leave a comment

0.0/5