Skip to content Skip to footer

दौंड तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लावला बालविवाह

दौंड :  दौंड तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे अपहरण  करून  तिचा बळजबरीने विवाह करणाऱ्या आई, मामासह  नवरदेवाला अटक केली आहे. दरम्यान, अल्पवयीन नवरीने जेजुरीच्या खंडोबारायानगरीतून पळ काढून स्वत:ची सुटका करून घेतली व पोलीस ठाणे गाठले. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिच्या आईसह नातेवाइकांनाही अटक केली.अटक केलेल्यांची नावे अशी : आई- सविता खरात (४२), मामा- शिवाजी चितळकर (४२, दोघेही रा. मलठण, ता. दौंड ), नवरा- रमेश घुले (वय २५, रा. कापडगाव , ता. खंडाळा, जि. सातारा), सिंधू ठवरे (वय ५३, रा. पिंपळे , ता. इंदापूर) तर दादा घुले (वय ५०) आणि अलका घुले (वय ४५, दोघेही रा.  कापडगाव, ता. फलटण, जि. सातारा) हे दोघे बेपत्ता झाले आहेत. दरम्यान अल्पवयीन पीडित मुलीला पुण्यातील बालसुधार गृहात पाठविण्यात आले आहे.

 अल्पवयीन मुलीला पुणे येथील बालसुधारगृहात पाठवण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांनी दिली.  पीडित मुलीची आई सविता खरात हिच्यासह  मलठण (ता. दौंड ) येथे मामाच्या घरी राहत आहे. त्यामुळे पीडित मुलगीही मलठण येथील दादोजी कोंडदेव विद्यालयात शिक्षण घेत होती. तिने नुकतीच ९ वी ची परीक्षा  होती.  तिला दहावीचे शिक्षण घ्यायची इच्छा होती. मात्र, तोपर्यंत सहा जून रोजी दुपारी १ वाजता तिचे मामा शिवाजी चितळकर, मामाची मावशी सिंधू ठवरे, आई सविता खरात यांनी तिला बोलावून  घेतले आणि गावाला जाण्याच्या बहाण्याने तिला  कापडगाव (ता. खंडाळा, जिल्हा सातारा) येथे एका इसमाच्या घरी नेले. तेथे त्याच दिवशी मामा आणि आई ने  रमेश घुले (वय २५ , रा. कापडगाव, ता. फलटण, जि. सातारा)  याच्या घरी नेले व त्याच्याशी तिचे लग्न ठरवले असून, आजच लग्न लावणार असल्याचे सांगितले.त्यावेळी पीडित मुलीने विरोध केला.
 मी १५ वर्षांची असताना दहा वर्षांनी मोठ्या असलेल्या २५ वर्षांच्या मुलाबरोबर लग्न करणार नसल्याचे तिने सांगितले. मात्र  तू अशीच बोलणार असल्यानेच तिला काही न सांगता थेट लग्नाला घेऊन आल्याचे सांगत नातेवाइकांनी दमदाटी केली. तिने नवरदेव आणि त्याच्या घरच्यांनाही विनवणी केली, मात्र त्यांनीही तिचे न ऐकता त्याच दिवशी लग्न केले.
दुसऱ्या दिवशी शुक्रवार  (७ जून) नवरा आणि पीडित तसेच त्याचे नातेवाईक जेजुरीला खंडोबाच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेतल्यावर मुलीने जेजुरी गडावरून पळ काढला आणि एसटीने दौंड गाठले व थेट पोलिसात येऊन आई व नवऱ्यासह नातेवाइकांची तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a comment

0.0/5