Skip to content Skip to footer

प्लास्टिकच्या विल्हेवाटीसाठी मशीन

चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे प्लास्टिकमुक्तीसाठी पुढाकार म्हणून पालिकेच्या मुख्यालय परिसरात ‘रिव्हर्स व्हेंडिंग मशीन’ लावण्यात आली आहे. याचे उदघाटन आज शुक्रवारी करण्यात आले.

चंद्रपूर शहरात पाण्याच्या प्लास्टिक बाटल्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. वापर केल्यावर त्यांची योग्य विल्हेवाट लावली जात नाही. या दृष्टीने मनपाने बँक आॅफ महाराष्ट्रच्या सहकार्याने रिव्हर्स व्हेंडिंग मशीन मनपा परिसरात लावण्यात आली आहे. या मशीनमधे कुठल्याही नागरिकाने त्यांच्याकडे असलेली जुनी बॉटल टाकल्यास प्लास्टिकमुक्तीकडे त्यांनी टाकलेले एक सकारात्मक पाऊल म्हणून शहरातल्या नामांकित खाद्यगृहांमधे वापरता येणारे डिस्काउंट कूपन मिळणार आहे.

एनडी हॉटेल, सॅफ्रोन रेस्टारंट, सिद्धार्थ हॉटेल, मामा जलेबी सेंटर, मॉर्सल्स रेस्टोरंट, त्रिमूर्ती संजय लस्सी सेंटर इत्यादी नामांकित खाद्यगृहांमधे कूपनचा वापर केल्यास ५ ते १० टक्के डिस्काउंट खाद्यपदार्थांवर मिळणार आहे. २३ मार्च २०१८ पासून महाराष्ट्र राज्यात पूर्णत: प्लास्टिक बंदी आहे. तरीही प्लास्टिकचा सार्वजनिक जीवनात वापर पाहिजे तितका कमी झालेला नाही. मनपातर्फे दंडात्मक कारवाईही अनेकदा करण्यात आली आहे. नागरिकांसाठी प्लास्टिक कचº्याची पयार्यी व्यवस्था म्हणून मनपाने रिव्हर्स व्हेंडिंग मशीन उपलब्ध करून दिली आहे.

या मशीनमधे ५००० पर्यंत बॉटल्स जमा केल्या जाऊ शकत असून प्लास्टिक बॉटल टाकल्यानंतर तिचे तुकडे होऊन ती कच्च्या स्वरूपात परिवर्तित होते. कच्च्या स्वरूपातील प्लास्टिकपासून टी. शर्ट, बॅग्स इत्यादी अनेक स्वरूपाच्या वस्तू बनविल्या जाऊ शकतात. यादृष्टीने मनपा लवकरच समोर प्रक्रिया करणार असून नागरिकांनी प्लास्टिक बॉटल्स रस्त्यावर, कचरापेटीत टाकण्याऐवजी रिव्हर्स व्हेंडिंग मशीनमधे टाकण्याचे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

मशीनच्या लोकार्पणाला महापौर अंजली घोटेकर व संजय काकडे, उपायुक्त गजानन बोकडे, नगरसेवक नंदू नागरकर, प्रदीप किरमे, दीपक जयस्वाल, बँक आॅफ महाराष्ट्रातर्फे प्रशांत गजभिये, पालकमंत्री फेलो पूजा द्विवेदी उपस्थित होते.

Leave a comment

0.0/5