Skip to content Skip to footer

चीनची सर्वाधिक गुजरातमध्ये गुंतवणूक, पुन्हा सामनातून भाजपाला टोला

चीनची सर्वाधिक गुजरातमध्ये गुंतवणूक, पुन्हा सामनातून भाजपाला टोला

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून पुन्हा एकदा भाजपाला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने चीनच्या ५९ अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे . केंद्र सरकारने चीनवर ‘डिजिटल स्ट्राइक’ केला. मात्र, गुजरात राज्यात चीनची सर्वाधिक गुंतवणूक आहे. तिथे 5G’ नेटवर्क उभे करण्याचे कंत्राट चीनच्या हुवेई कंपनीला मिळाले आहे. चिनी कंपनीच्या हाती भारताच्या डिजिटल चाव्या देणे घातक आहे, असा टोला सामनाच्या अग्रलेखातून भाजपाला मारला आहे.
चिनी कंपनीच्या हाती भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेच्या चाव्या असणे म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेची भविष्यातील मालकी चिनी कम्युनिस्ट पार्टीकडे असण्यासारखे आहे. हे प्रकरण भविष्यात देशाला सर्वात जास्त घातक ठरणार आहे हे काय सरकारला कळू नये का?”, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे
चिनी अ‍ॅप्सपासून राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे हे सरकारला नेमके कधी समजले? राष्ट्रीय सुरक्षेला धोका होताच तर मग इतकी वर्षे हे सर्व अ‍ॅप्स आणि त्यांचे व्यवहार आपल्या देशात बिनबोभाट कसे सुरु होते? म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नाकडे सरकारने दुर्लक्षच केले असा आरोप विरोधकांनी केला तर त्यावर सरकारची भूमिका काय असेल?”, असे प्रश्न ‘सामना’च्या अग्रलेखातून विचारण्यात आले आहेत.
चिनी अ‍ॅप्समार्फत देशाची माहिती बाहेर जात असल्याचं खरं असेल तर इतकी वर्षे हे ‘अ‍ॅप’ चालू देणार्‍या सर्वच सरकारांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करावे लागेल असंदेखील ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे. टिकटॉकसारखे चिनी अ‍ॅप अश्लीलता आणि इतर घाणेरड्या गोष्टींना उत्तेजन देत होते. त्यातून म्हणे अनेक ‘टिकटॉक’ स्टार्स निर्माण झाले. यातील काही टिकटॉक स्टार्सनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. आता राजकारणात शिरलेल्या या चिनी टिकटॉक स्टार्सचे काय होणार हा प्रश्नच आहे असे अग्रलेखात म्हटले आहे.

Leave a comment

0.0/5