मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतंर्गत कृषीपंपाना दिवसा वीज पुरवठा.
विद्युत नियमक आयोगाच्या मान्यतेनुसार राज्यातील कृषीपंपाना दिवसा ८ तास किंवा रात्री १० तास आठवड्यात चक्राकार पध्दतीने थ्री फेज वीज पुरवठा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. परंतु रात्रीच्या वेळेस कृषीपंपाना देण्यात येणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे येणाऱ्या अडचणी तसेच शेतकरी व लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या सुचना विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना दिवसा विद्युत पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेव्दारे उपकेंद्राजवळ सौर ऊर्जा प्रकल्प उभारुन निर्माण होणारी विज कृषी वाहिनीव्दारे दिवसा देण्याचे निश्चित केले असल्याचे राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना पत्राद्वारे कळविले आहे.
या योजनेव्दारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर, २०२० पासून राज्यातील कमीत कमी ५० वीज वाहिन्यावरील अंदाजे २५ हजार शेतक-यांना दिवसा वीज उपलब्ध करुन देण्यात येणार असून, या योजनेतंर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे जळगाव जिल्ह्यातील पाच कृषि वाहिन्यांची निवड झाली आहे. यात पारोळा तालुक्यातील मेहुटेहू, उंदिरखेडा, शेळावे, विचखेडा, शेवगे या उपकेंद्रातील वाहिन्यांना दिवसा विज उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही उर्जामंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे.
राज्यातील कृषी पंपाच्या थकबाकीचा आकडा हा व्याज व दंडासहिता सुमारे ४२ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहचला आहे. कृषी पंपाच्या थकबाकी बाबतचे धोरण हे महाराष्ट्र शासनाच्या विचाराधीन आहे. परंतु सध्याची महावितरणची आर्थिक परिस्थिती विचारात घेता वरील योजनेची अंमलबजावणी करते वेळेस त्या वीज वाहिन्यावरील कमीत कमी ८० टक्के कृषी ग्राहकांनी चालू वीजदेयके भरणे अपेक्षित असल्याचा उल्लेखही उर्जामंत्र्यांनी पालकमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात केला आहे.
जळगाव जिल्ह्यात सर्व आमदारांच्या सहकार्याने ही योजना यशस्वी करण्याकरीता आणि जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतक-यांना या योजनेचा लाभ मिळून दिवसा वीज उपलब्ध करुन देण्यासाठी सतत पाठपुरावा सुरु आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील वीज वितरणासंबंधिच्या प्रलंबित कामांसाठी सर्व आमदारांच्या उपस्थितीत मंत्रालयात ऊर्जामंत्र्यांकडे स्वतंत्र बैठकही घेण्यात येणार आहे. निवड झालेल्या उपकेंद्राजवळ सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी शासकीय/खाजगी जागा उपलब्ध करुन देण्याकरीता सर्व्हेक्षण करण्याचे निर्देशही ना.गुलाबराव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.