शिवसेना पक्षाचा यंदाचा दसरा मेळावा कोरोनाच्या संसर्गामुळे वीर सावरकर सभागृहात रविवारी पार पडला. यावेळी शिवसेना खासदास संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला लगावला होता. दसरा मेळाव्यात बोलताना संजय राऊत म्हणाले की, जर कोरानाचे संकट नसत आणि सगळं सुरळीत असतं तर सगळ्या जगाने नोंद घेतली असती. हा महाविजय दसरा मेळावा आहे. गेल्या वर्षी याच दिवसांमध्ये विजयाला प्रारंभ झाला. महाराष्ट्रात आपण असत्यावर विजय मिळवला, असे म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला होता.
पुढे बोलताना राऊत यांनी २०१९ च्या दसरा मेळाव्याची आठवण करून देताना म्हणाले की, गेल्या वर्षीच्या दसरा मेळाव्यात सांगितले होते की पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी आम्हाला रस्ता दाखवला. त्यातून मला आत्मविश्वास मिळाला आणि आपण महाराष्ट्रातील ११ कोटी जनतेचे मुख्यमंत्री झालात, असे राऊत यावेळी म्हणाले. यावेळी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना झालेल्या कोरोना संसर्गावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, कार्यक्षम विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रकृतीस आराम पडावा. त्यांनी लवकर बरं व्हाव. कारण लढण्यासाठी समोर पैलवान असायला पाहिजे, संजय राऊत म्हणाले.