विजया दशमी निमित्ताने पंकजा मुंडे यांनी रविवारी ‘आपला दसरा’ या कार्यक्रम अंतर्गत भगवान गडावरून आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. या कार्यक्रमाला पंकजा मुंडे नेमकं काय बोलणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात अनेक सूचक इशारे दिले आहेत. पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात झालेल्या भाषणावर राजकीय वर्तुळात आता जोरदार चर्चा रंगताना दिसून येत आहे.
यंदाच्या विधानसभेतील झालेल्या पराभवानंतर पंकजा मुंडे पक्षातील काही नेत्यावर प्रचंड नाराज होत्या. पुढे राज्यसभेची उमेदवारी असो वा राज्याची कार्यकारणी पंकजा मुंडे यांना वारंवार डावलण्यात आल्याने पंकजांची नाराजी वाढल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगल्या होत्या. मात्र, एकनाथ खडसेंप्रमाणे कधीही पंकजांनी आपली नाराजी उघडपणे जाहीर केली नाही. आता पक्षाच्या केंद्रीय कार्यकारणीत मोठी जबाबदारी मिळाल्याने पंकजांची नाराजी दूर झाल्याचे म्हटलं जातं असले तरीही खरंच असे आहे का ? हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. पंकजा मुंडे यंदाचे दसरा मेळाव्याचे भाषण म्हणून सूचक ठरतं आहे.