सरसंघचालक व शिवसेना पक्षप्रमुखांची भाषणे हिंदुत्वाला दिशा देणारी होती ! – सामना
दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही संघाचा आणि शिवसेनेचा मेळावा रविवारी संपन्न झाला. या मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत आणि शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वावरून विरोधकांना चांगलेच खडेबोल सुनावले. आणि याच मुद्द्यांवरून शिवसेनेने आजच्या सामनातून विरोधकांना चांगलेच धारेवर धरले आहे.
‘हिंदुत्व हे थाळ्या, घंटा बडवण्यापुरते नाही तसे दाढी-मिश्यांपुरते मर्यादित नाही. चापेकर बंधूंना दाढी नव्हतीच, पण तीनही चापेकर बंधू हसत हसत देशासाठी फासावर गेले. अशा मर्दानगीची अनेक उदाहरणे आहेत. सरसंघचालक व शिवसेना पक्षप्रमुखांची भाषणे हिंदुत्वाला व राष्ट्रीय ऐक्याला दिशा देणारीच होती. नागपुरात आणि मुंबईतील वीर सावरकर स्मारक सभागृहात दसऱ्याच्या निमित्ताने हिंदुत्वावर मंथन झाले. दोन्ही नेत्यांचे अभिनंदन!’, असे म्हणत शिवसेनेने सरसंघचालक व शिवसेना पक्षप्रमुखांचे कौतुक केले आहे.
दसऱ्याच्या निमित्ताने दोन मेळावे गाजले. पहिला नागपूरचा आरएसएसचा वार्षिक विजयादशमी मेळावा, दुसरा अर्थातच मुंबईतील शिवसेनेचा दसरा मेळावा. कोरोनाच्या संसर्गामुळे दोन्ही मेळावे बंद सभागृहांत झाले. पण मेळाव्यांच्या प्रमुख सूत्रधारांनी मांडलेले हिंदुत्वाबाबतचे विचार देशभर पोहोचले आहेत. दोन्ही व्यासपीठांवरील भाषणे म्हणजे सडेतोड तोफखानेच ठरले! सरसंघचालक मोहन भागवत यांनी दसरा मेळाव्यात हिंदुत्वाची व्याख्या स्पष्ट करून सांगितली आहे.
संघाच्या दृष्टिकोनातून हिंदुत्वाचा अर्थ व्यापक असून पूजा पद्धतीशी जोडून त्याला समुचित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हिंदुत्व हे देशाच्या स्वत्वाचे सार असल्याची भूमिका मोहन भागवत यांनी मांडली. हिंदुत्व ही जणू आपलीच मक्तेदारी, जे भाजपबरोबर नाहीत ते हिंदू नाहीत अशा विपृत विचारसरणीपर्यंत काही ठेकेदार पोहोचले असतानाच सरसंघचालकांनी त्या ठेकेदारांचे दात नागपुरात घशात घातले आहेत, असे सामनातून म्हणण्यात आले आहे.