गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना कोरोना संदर्भात सदिच्छा.
रिपाई नेते, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. यासंदर्भातील माहिती त्यांनी ट्विटवरून दिली होती. सध्या त्यांची तब्येत व्यवस्थित असून, डॉक्टरांच्या सल्यानुसार खाजगीची रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या संदर्भात आज राष्ट्रवादीचे नेते, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून रामदास आठवले यांच्याच स्टाईलमध्ये त्यांना यातून लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा दिल्या.
“करोना-गो’ चा घेतला ज्याने वसा, ग्रासले त्याच कविमित्र रामदासा; धीर नका सोडू प्रसंग जरी आला बाका, कोरोनात नाही दम इतका जो तुम्हा लावील धक्का. रामदास आठवले लवकर बरे व्हा”, असे म्हणत अनिल देशमुख यांनी आठवले यांच्याच कवितेच्या शैलीत सदिच्छा दिल्या. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांना सदिच्छा दिल्या.
कोरोनाची साथ नव्यानेच आली होती तेव्हा “गो करोना करोना गो” अशी घोषणा दिल्याने रामदास आठवले हे चांगलेच चर्चेत आले होते. मुंबईतील नरीमन पॉईंट या ठिकाणी त्यांनी या घोषणा त्यावेळी दिल्या होत्या. आता रामदास आठवलेंना कोरोनाने ग्रासले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ते खासगी रुग्णालयात दाखल झाले आहेत.